मानसरोवर नव्हे, मानस सरोवर
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मानसरोवर नव्हे, मानस सरोवर Bookmark and Share Print E-mail
लेख
सत्त्वशीला सामंत , रविवार, १३ जून २०१०
अलीकडे मराठी वृत्तपत्रांतून ‘कैलास-मानसयात्रे’च्या जाहिराती वाचताना अनेकदा ‘मानसरोवर’ असा उल्लेख वाचनात येत होता. हा बहुतेक मुद्रणदोष असावा किंवा यात्राकंपन्यांचे अज्ञान असावे असा माझा समज झाला होता. केव्हातरी वृत्तपत्रांना पत्र लिहून अज्ञजनांचे  अज्ञान दूर करावे असा विचार मनात घोळत असतानाच, सुप्रसिद्ध लेखक रमेश देसाई यांचे ‘तिसरा ध्रुव- हिमालय सर्वागदर्शन’ (राजहंस प्रकाशन) हे सर्वागसुंदर पुस्तक हाती आले. तथापि, त्यात मला एक धक्कादायक गोष्ट आढळली. पृ. ८६ वर ‘मानसरोवर की मानस सरोवर?’ अशी एक चौकट टाकलेली असून, त्यात या दोन नावांची संक्षिप्त चर्चा दिलेली आहे. प्रस्तुत लेखकाने त्यापैकी  ‘मानसरोवर’ हे नाव प्रमाण मानले आहे, असा त्यातून निष्कर्ष निघतो. त्यातून माझी शाब्दिक कैलास-मानस यात्रा आणि ‘मानसरोवर की मानस सरोवर?’ ही शोधमोहीम सुरू झाली.
हिमालयातील कैलास पर्वताजवळचे हे मूळचे ‘मानस सरोवर’ आहे याबद्दल माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही. कारण संस्कृत साहित्यात याविषयी मुबलक पुरावे आहेत. परंतु ‘मानस सरोवर’ ते ‘मानसरोवर’ हा शब्दप्रवास भाषाशास्त्रीयदृष्टय़ा रंजक असला तरी तो ‘सुंदर होता’ असे मात्र खास म्हणता येणार नाही. जेव्हा एखाद्या शब्दात वा जोडशब्दात दोन समान वर्ण सलग येतात तेव्हा, सामान्य लोकांच्या उच्चारणाची प्रवृत्ती सौकर्याकडे वा शीघ्रतेकडे असल्याने, त्यापैकी एक वर्ण लोप पावण्याची शक्यता असते व तसे कित्येकदा घडतेही. या प्रकाराला इंग्रजीत haplology (सवर्णतरलोप) असे म्हणतात. ही अगदी स्वाभाविक प्रक्रिया आहे. उदा.- (‘नक+कटा’पासून ‘नकटा’ किंवा इंग्रजीतील anise + seed - aniseed, इ.)
यात कांहीच गैर नाही. त्याप्रमाणे ‘मानस सरोवर’ या जोडशब्दात ‘स’ वर्णाची पुनरावृत्ती झाली असल्याने, त्यांपैकी एक ‘स’ गळला आणि त्यातून ‘मानसरोवर’ जन्माला आले हा माझा स्वत:चा ठाम निष्कर्ष आहे. इथवर सर्व ठीक आहे. मामुली शब्दांच्या बाबतीत ‘शास्त्राद रूढिर्बलीयसी’ या तत्त्वानुसार असा वर्णलोप खपवून घेता येतो. पण ज्या मूळ शब्दांच्या मागे एखाद्या भाषेची सांस्कृतिक परंपरा उभी आहे अशा ‘मानस सरोवर’सारख्या शब्दांतील वर्णलोपाला मान्यता दिल्याने, ती सांस्कृतिक परंपराही लोप पावण्याचा धोका संभवतो, म्हणून अशा शब्दांच्या बाबतीत संबंधित समाजातील बुद्धिमंत वर्गाने जागरूक व संवेदनाक्षम असणे आवश्यक आहे. ‘मानस सरोवर’ या शब्दाच्या बाबतीत हा अनर्थ घडू पाहत आहे, नव्हे तो घडल्यातच जमा आहे.
मुळात ही अनर्थपरंपरा हिंदी भाषेपासून सुरू झाली. यालाही खूप वर्षे झाली. स्व. प्रेमचंद यांची ‘मानसरोवर’ या शीर्षकाची कथासंग्रह-मालिका आहे. म्हणजे जनसामान्यांच्या उच्चारणातील घसरणीला हिंदी साहित्यात राजरोस प्रतिष्ठा मिळाली. एवढेच नव्हे तर, आता ‘मानसरोवर’ हे नामाभिधान ‘सव्‍‌र्हे ऑफ इंडिया’च्या नकाशापासून ‘ऑक्सफर्ड अ‍ॅटलास’, ‘वर्ल्ड बुक ज्ञानकोश’, एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका यांच्यापर्यंतही पोचून ते बऱ्यापैकी स्थिरावले आहे. १९७९ साली प्रकाशित झालेल्या Haack Geographical Atlas या जर्मन नकाशात ‘मानसरोवर’ असाच उल्लेख आहे. आता ही गोष्ट आंतरराष्ट्रीय थराला गेली असल्याचे लक्षात आल्यावर, ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण काहीतरी केलेच पाहिजे असे माझ्या मनाने घेतले. त्या प्रेरणेतून मी हिंदीबरोबरच इतरही भारतीय भाषांचा मागोवा घेतला. (हिंदी भाषकांनी ‘हृषीकेश’चेही ‘ऋषिकेश’ असे निर्थक नामांतर केले आहे.)
हिंदीपुरते बोलायचे तर, हिंदीभाषी समाज ज्या तुलसी रामायणाचे माहात्म्य मानतो त्याच्या सारतत्त्वाचाच त्याला विसर पडला आहे. ‘रामचरितमानस’ या शीर्षकातच ‘मानस सरोवरा’चा उल्लेख आहे. या ग्रंथाच्या प्रारंभीच्या भागात तुलसीदासांनी ‘रामचरित्र’ हे जणू काही ‘मानस सरोवर’ आहे असे कल्पून त्यात समस्त जनांनी अवगाहन करावे असे आवाहन केले आहे. ‘भुशुंडि-गरुड’ आदी चार संवाद हे या सरोवराचे चार घाट असून, त्या ग्रंथातील बालकांडादि सात कांडे म्हणजे सात पायऱ्या होत, इ. वर्णन करून तुलसीदासांनी हे सांग रूपक रचले आहे. तसेच, ‘सरजू’ म्हणजे ‘सरयू’ (शरयू) ही पवित्र नदी ‘सुमानस-नंदिनी’ (मानस सरोवरात उगम पावणारी मानसकन्या) होय असेही ते वर्णन करतात. एवढा सारा धार्मिक व सांस्कृतिक इतिहास दुर्लक्षून हिंदी भाषकांनी ‘मानसरोवर’ला प्रामाण्य बहाल करावे हा खरोखरी दैवदुर्विलास होय!
हिंदी शब्दकोशांची साक्ष काढली तेव्हा असे आढळले की, बहुतेक जुन्या प्रमाण हिंदी शब्दकोशांनी ‘मानस’ या नोंदीखाली ‘मानस सर’ व ‘मानसरोवर’ हे दोन्ही शब्दार्थ दिलेले आहेत, काहींमध्ये फक्त ‘मानसरोवर’ हा शब्दार्थ दिला आहे. (मात्र त्यांनी ‘मानसहंस’ अशीही नोंद दिली आहे.) आधुनिक हिंदी शब्दकोशांनी मात्र फक्त ‘मानसरोवर’ अशीच मूळ नोंद केलेली दिसते. प्रा. रमेश देसाई यांनी ‘मानसरोवर’ हा पर्याय स्वीकारताना, हिमालयाचे दोन नामवंत स्थलशोधक (explorers) स्वामी प्रणवानंद व पं. राहुल सांकृत्यायन यांचा हवाला दिला असून तो बरोबरच आहे. तथापि, स्वामी प्रणवानंदांनी आपल्या Kailas-Mansarovar या ग्रंथातील नकाशा क्र. २ मध्ये Manasarovar or Manas Sarovar असा उल्लेख केलेला आहे. पं. राहुल सांकृत्यायन यांनी आपल्या सर्व प्रवासवर्णनपर ग्रंथांत ‘मानसरोवर’ हेच व्यावहारिक नाव स्वीकारले असले तरी, त्यांच्या ‘हिमालय परिचय’ नामक ग्रंथातील दहाव्या अध्यायात (प्रकरणात) ‘तीर्थयात्रायें’ या सदराखाली हिमालय प्रदेशातील ‘कत्यूरी’ या प्रथम राजवंशाची जी माहिती दिली आहे तीमध्ये ‘मानसखंड’ व ‘मानसप्रदेश’ हे भौगोलिक स्थलवाचक उल्लेख आहेत.
भारतीय संस्कृतीला संस्कृत साहित्याचा समृद्ध वारसा आहे ही गोष्ट सर्वमान्य आहे. वाल्मीकिरामायणानुसार-
कैलासशिखरे राम मनसा निर्मितं परम्।
ब्रह्मणा नरशार्दूल तेनेदं मानसं सर:।।
तस्मात्सुस्राव सरस: साऽयोध्यामुपगूहते।
सर:प्रवृत्ता सरयू: पुण्या ब्रह्मसरश्र्च्युता।। (बालकांड)

‘ब्रह्मदेवाने आपल्या मनापासून निर्मिले ते ‘मानस सर (सरोवर)’ आणि त्यात उमग पावलेली ती सरयू नदी अयोध्येला आलिंगते’ असा या श्लोकाचा सारांश आहे. (ही प्राचीन ‘सरयू’ म्हणजे मानस सरोवरात उगम पावणारी आधुनिक काळातील ‘करनाली’ वा ‘घोग्रा’ नदी होय.) ‘महाभारता’तही ‘मानस तीर्थ’ असे बरेच उल्लेख आहेत. (Mahabharata Cultural Index - M. A. Mehandale)
मानस सरोवर आणि हंस- विशेषत: राजहंस पक्षी यांचे साहचर्य तर संस्कृत साहित्याला सुपरिचित आहे. कालिदासाचे ‘विक्रमोर्वशीयम्’ (मानसोत्सुकचेतसां.. राजहंसानां..) ‘मेघदूत’ (कृतवसतयो मानसं.. राजहंसा, मानसोत्का: राजहंसा:, सलिलं मानसस्य..), ‘रघुवंश’ (मानसराजहंसीम्) आणि जगन्नाथ पंडिताचा ‘भामिनीविलास’ (..सरसि मानसे.. मरालकुलनायक: (राजहंस)..) हे सर्व काव्यनाटकादि वाङ्मय याला पुरेपूर साक्ष आहे.
संस्कृतमध्ये हंसदेवविरचित ‘मृगपक्षिशास्त्र’ (प्रका. साहित्य संस्कृती मंडळ) नावाचा एक ग्रंथ असून, त्यात ‘मानसवासी हंस’ म्हणून एका उपजातीचा उल्लेख आहे. सदर ग्रंथाचे संपादक मारुती चितमपल्ली यांनी आधुनिक काळातील mute swan असा त्याचा अन्वयार्थ लावला आहे. अमरकोशात ‘मानसौकस्’ (ओकस् = घर) हा ‘हंस’ शब्दाचा एक पर्याय आहे.
कैलास- मानस हे जसे हिंदुधर्मीयांचे तीर्थस्थळ आहे त्याप्रमाणे जैनधर्मीयांचेही ते पवित्र ठिकाण आहे. कारण जैनांचा प्रथम र्तीथकर ऋषभदेव आयुष्याच्या अंतकाळी येथील पर्वतावर आठ पावले चढून गेल्यावर त्याचे महानिर्वाण झाले असे सांगतात. त्यामुळे जैनांचे धार्मिक वाङ्मय ज्या प्राकृत भाषांमध्ये ग्रंथनिविष्ट झाले आहे त्या भाषा म्हणजे- जैन महाराष्ट्री, अपभ्रंश व अर्धमागधी- या सर्वामध्ये ठिकठिकाणी ‘माणससर’ असे उल्लेख आहेत. (बौद्धांचीही तीर्थक्षेत्रे आसपासच्या भागात असली तरी पालिवाङ्मयात मात्र ‘मानस सर’ असा उल्लेख दिसत नाही. त्याऐवजी त्यांच्याकडे ‘अनोतत्त सर’ (अनवतप्त = शीतल) असा उल्लेख सापडतो. तो बहुधा वायुपुराणात उल्लेखिलेल्या ‘शीतोद’ या सरोवराशी निगडित असावा.)
इतर भारतीय भाषांमध्ये वेगवेगळे प्रवाह आढळतात. हिंदीच्या संसर्गाने काश्मिरी, राजस्थानी, ओडिआ या भाषांनी दैनंदिन व्यवहारात सरसकट ‘मानसरोवर’ हे नाव स्वीकारलेले आहे. मात्र काश्मिरीमध्ये हंस पक्ष्याला ‘मानसालय’ असे म्हणतात, तर ओडिआ भाषेतील शब्दकोशात (तरुण शब्दकोश : संकलक- पं. कृष्णचंद्रकर) ‘मानसर’ व ‘मानस सर’ असे दोन्ही पर्याय दिलेले आहेत. गुजरातीमधील बहुसंख्य शब्दकोशांत ‘मानस सर’ हीच नोंद असली तरी, ‘सार्थ गुजराती जोडणी कोश’ या महत्त्वपूर्ण कोशात मात्र ‘मानसर’ व ‘मानससर’ असे दोन्ही पर्याय दिलेले आहेत. (पंजाबी भाषेचा शोध मात्र अजून लागलेला नाही; त्यासाठी प्रयत्न चालू आहे.)
याउलट, पूर्व व दक्षिण भारतातील भाषांमध्ये ‘मानस’ या शब्दाला विशेष प्रतिष्ठा आहे. आसाममध्ये ‘मानस’ व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आहे; बंगाली (‘चलंतिका’ शब्दकोश : सं. राजशेखर बसु) आणि तेलुगू, कन्नड, तमिळ, मलयालम् या सर्व दाक्षिणात्य भाषा यांनी ‘मानस’चे विरूपीकरण केलेले नाही. (कर्नाटकातील म्हैसूरमधील केंद्र सरकारच्या ‘केंद्रीय भारतीय भाषा संस्थान’च्या इमारतीचे नाव ‘मानसगंगोत्री’ असे आहे.) सिंधी भाषेनेही हे ‘मानस’ रूप जपले आहे. ‘मराठी विश्वकोशा’चे अनुकरण करून कोकणी भाषेच्या ज्ञानकोशात ‘मानसरोवर’ अशी नोंद असली तरी, कोकणी भाषकांनी दैनंदिन व्यवहारात ‘मानस सरोवर’ हेच रूप टिकवले आहे.
संत मंडळातील नामदेव महाराजांनी उत्तर भारताची यात्रा केली व त्यांनी विशेषत: पंजाबात आपल्या कार्याचा बराच प्रसार केला व म्हणून त्यांना शीख संप्रदायात मानाचे स्थान प्राप्त झाले ही गोष्ट सर्वज्ञात आहे. त्या नामदेवांच्या ‘तीर्थावळी’तील एका अभंगात -
तेथुनि जातां उत्तरपंथें.. हिंवाचा पर्वत उलंघितां..
उल्हास मानस सरुवर देखिलें जेथें।।
जैसे पइले आकाशें सुवर्णाच्या खाणी
ज्याच्या होकुनि आद्यापि क्रीडती राजहंस।।

(सरकारी गाथा- परिशिष्ट ‘क’- तीर्थावळीचे अभंग १२ वा छेदक) असा स्पष्ट उल्लेख आहे. पंतकवींपैकी मोरोपंतांचे ‘आर्याभारत’ (न क्षोभे जेविं मानसीं हंस.. सभापर्व १.९६)
रघुनाथ पंडितांच्या ‘नलदमयंतीस्वयंवराख्यान’मधील हंसाचे उद्गार- (..सोडुनि मानस केली।.. ।।४५।।
जो मानसीं विहरतो विहरो परी तो।
राखीं नळा निजयशोमय हंस राया। ।।१०१।।)

..आणि अर्वाचीन काळातील गोविंदाग्रजांची ‘राजहंस माझा निजला’ ही कविता- (या माझ्या मानससरसीं।.. ..राजहंस पोहत राही।)- या सर्व मराठी सारस्वताने आजतागायत हा ‘मानस’ वारसा टिकवला आहे.
त्याचप्रमाणे य. रा. दाते आणि मंडळी यांचा ‘महाराष्ट्र शब्दकोश’, मोल्सवर्थचा मराठी-इंग्रजी शब्दकोश, द. ह. अग्निहोत्री यांचा ‘अभिनव मराठी-मराठी शब्दकोश’ या सर्वानी ‘मानस’ या सदराखाली ‘हिमालयातील एक सरोवर’ अशी नोंद केलेली आहे.
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रातील ज्या काही यात्रेकरूंनी हिमालय यात्रा करून प्रवासवर्णने लिहिली त्यापैकी ग. पां. नाटेकर (‘कैलास मानससरोवर दर्शन’), शंकर सखाराम दाते (‘हिमालय दर्शन- भाग २- कैलास-मानस यात्रा’), उमाबाई चाफेकर (‘श्री मुक्तिनाथ यात्रा वर्णन’) या सर्वानी ‘मानस सरोवर’ असाच शब्दप्रयोग केलेला आहे. याव्यतिरिक्त, पाश्चात्त्य देशांतील ज्या स्थलशोधकांनी हिमालय यात्रा करून, संशोधनपर ग्रंथ लिहिले त्यांचाही आढावा घ्यावयास हवा. त्या दिशेने माझे प्रयत्न चालू आहेत, पण अजून शोध पूर्ण झालेला नाही. तथापि आतापर्यंत जे काही हाती लागले त्यानुसार, सुप्रसिद्ध स्वीडिश संशोधक स्वेन हेडिन् यांनी आपल्या ‘ट्रान्स्हिमालय’ या द्विखंडी ग्रंथात Lake Manasa असा निर्देश केला आहे; तर दुसरे संशोधक मूरक्रॉफ्ट यांच्या संदर्भातील एका संशोधन लेखाचे शीर्षक पुढीलप्रमाणे आहे - Moorcroft's Journey to Manasasarovara (Asiatic Researches, XII-466). भारत सरकारच्या प्रकाशन विभागाने पूर्वी बी. एन. दातार यांचे Himalayan Pilgrimage हे पुस्तक प्रसिद्ध केले होते, त्यातील नकाशात Manasa Lake असाच निर्देश आहे. मराठी विश्वकोशात प्रेमलता खंडकर यांनी लिहिलेल्या नोंदीनुसार चिनी भाषेत या सरोवराला ‘मानासालॉवू’ असे म्हणतात. या शब्दाचे ‘मानस’शी असलेले साधम्र्य लक्षणीय आहे.
पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या ‘भारतीय संस्कृतिकोशा’त ‘मानस’ अशीच नोंद आहे. मात्र तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या ‘मराठी विश्वकोशा’त ‘मानसरोवर’ अशी नोंद केलेली पाहून सखेद आश्चर्य वाटले. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र सारस्वताने आजवर जपलेल्या परंपरेला एका सरकारमान्य व प्रतिष्ठित ज्ञानकोशाने धक्का दिलेला आहे. हिंदीच्या दुष्प्रभावामुळे प्रसारमाध्यमातील मराठी दिवसेंदिवस भ्रष्ट होत चाललेली आहेच. अशा भाषिक अपभ्रंशाला व अध:पाताला ‘मराठी विश्वकोशा’सारख्या प्रतिष्ठितांनी हातभार लावणे उचित नाही.
एखाद्या भाषक समाजाने एकजूट करून मनावर घेतले तर ‘बेनारस’चे ‘वाराणसी’, ‘मद्रास’चे ‘चेन्नई’, ‘त्रिवेंद्रम’चे ‘थिरुअनंतपुरम’, ‘बॉम्बे’चे ‘मुंबई’ असे पूर्वगामी नामांतर होऊ शकते. मग ‘मानसरोवर’चे ‘मानस सरोवर’ असे सुभग व यथार्थ नामांतर का होऊ नये? पण त्यासाठी समाज एकत्र आला पाहिजे, आपल्या लोकप्रतिनिधींनी तो झेंडा खांद्यावर घेतला पाहिजे. मी आणि माझा मित्रपरिवार यासंबंधात ‘सव्‍‌र्हे ऑफ इंडिया’शी पत्रव्यवहार करून हा प्रश्न धसाला लावू इच्छितो. अन्य कोणा भाषाप्रेमी व्यक्तींना या प्रयत्नात सहभागी व्हायचे असेल तर, त्यांनी आम्हाला अवश्य साथ द्यावी.
कारण, ‘मानसरोवर’ हे वास्तव असले तरी ‘मानस सरोवर’ हे सत्य आहे. सध्या ते सत्य झाकोळले गेले असल्याने, त्यावरची काजळी झाडून ते लखलखीत उजेडात आणले पाहिजे. अखेरीस ‘मानस सरोवर’ हा भारतीय संस्कृतीचा मानबिंदू आहे!
(ऋणनिर्देश : डॉ. प्र. के. घाणेकर/ कलिका मेहता/ स. म. परळीकर/ नि. ना. रेळेकर/ आर. पी. पोद्दार आणि इतर)