नृत्य स्पर्धेत बक्षिसांचा ‘पाऊस’!
|
|
|
|
|
नगर वृत्तान्त
|
निघोज, १६ जानेवारी/वार्ताहर नाटय़ किरण मंच, तसेच कलाप्रेमी गावकऱ्यांनी आयोजित केलेल्या बालसांस्कृतिक स्पर्धेत बल्लवी वरखडे ग्रूपने सादर केलेल्या इष्काची बिजली कडाडली या नृत्यास पहिले, तर जांबूत (तालुका शिरूर) येथील जयमल्हार हायस्कूलच्या वाजले की बारा या गाण्यावर नृत्य सादर करणाऱ्या संघास दुसरे बक्षीस मिळाले.
हिंदी मराठी गाण्यांचा मिलाफ घडवित नृत्य सादर करताना जुन्नर, शिरूर, पारनेर या तीन तालुक्यांतील ३० संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेच्या अकराव्या वर्षी गावकऱ्यांचा उत्साह टिकून होता. मकरसंक्रांतीच्या रात्री ९ वाजता सुरू झालेली स्पर्धा मध्यरात्रीनंतर दोनपर्यंत रंगली. गारठणाऱ्या थंडीत उदंड प्रतिसादाने स्पर्धा गाजली. स्पर्धेत सहा संघांना २० हजार रुपयांची बक्षिसे मिळाली, तसेच उत्स्फूर्त नृत्याविष्कार सादर करणाऱ्या स्पर्धकांवर तब्बल ५० हजारांची दौलतजादा शौकिनांनी उधळण केली. पठारवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलने तिसरे, टाकळीहाजी येथील उचाळेवस्तीने चौथे, ढवळपुरी आश्रमशाळेने पाचवे, तर निघोजच्या वात्सल्य ग्रूपने सहावे बक्षीस मिळविले. ग्रूपच्या मोनिका सुनील कदम हिच्या आईचा जोगवा या नृत्यावर टाळ्यांसह पैशांची बरसात झाली. लक्षवेधी स्त्री कलाकाराचे बक्षीस सलोनी आदमाने व मोनिका कदम यांना विभागून देण्यात आले. लक्षवेधी पुरूष बक्षीस सौरभ कडूस्कर, वेशभूषेचे नेताजी सुभाषचंद्र विद्यालय (पानोली), तर परीक्षक म्हणून मोमीन कवठेकर, शिवाजी पिंपरकर, प्रयागा अशोक ठुबे यांनी काम पाहिले. नाटय़किरणचे अध्यक्ष बाळासाहेब निचित, उपाध्यक्ष रामदास कवाद, सचिव राजेंद्र उनवणे, कन्हैया दूधउद्योग समूहाचे मच्छिंद्र लंके, कलाप्रेमीचे अध्यक्ष भगवान लामखडे, डॉ. महेंद्र झावरे, बबनराव ससाणे आदींच्या हस्ते बक्षीसवितरण झाले. राजेश मंचरे यांनी निवेदन, तर सोमनाथ वरखडे यांनी सूत्रसंचालन केले. |