मावळमधील एमआयडीसी विस्तारीकरणास ग्रामस्थांचा विरोध
|
|
|
|
|
पुणे वृत्तान्त
|
तळेगाव दाभाडे, २मे/वार्ताहर नवलाख उंबरे (ता. मावळ) कार्यक्षेत्रातील फेज दोनच्या एमआयडीसी विस्तारीकरणास ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून तसा ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर करून शासनास लेखी कळविले आहे.
नवलाख उंबरे, बधलवाडी, परीटवाडी, जाधववाडी व मिंडेवाडी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी यापूर्वी एमआयडीसीसाठी व जाधववाडी धरणासाठी संपादित केलेल्या आहेत. तरीही एमआयडीसी विस्तारीकरणासाठी पुन्हा शासन जमिनी संपादित करू पाहात आहे.त्यादृष्टीने मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना मोजणी करण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध करून मोजणी करू दिली नाही. सरपंच नागेश शिर्के, माजी सरपंच प्रभाकर बधाले, मारुती बधाले, चिंधूदास बधाले, माणिक जाधव यांचे नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन करून मोजणी मज्जाव केला आणि मावळचे माजी सभापती निवृत्ती शेटे, जि. प. सदस्य प्रशांत ढोरे, कृती समिती अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, भाजपचे प्रसिद्धी प्रमुख विकास शेलार, दत्तात्रय दाभाडे, तालुका मनसे अध्यक्ष सचिन भांडवलकर यांनी शेतकऱ्यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. नव्याने शासन संपादित करू पाहात असणाऱ्या जमिनी बागायती क्षेत्र आहे. पाणी वाटपासाठी शेतकऱ्यांच्या चार जलसिंचन संस्था कार्यरत आहेत. सदर क्षेत्रात ५७ विहिरी असून घरे व गोठे सुमारे १७५ आहेत. ६ पोल्ट्री फार्मस आहेत. तसेच जाधववाडी धरणातून पाणी उचलण्यासाठी (सुमारे ३५० एकर क्षेत्रासाठी) परवाना मिळालेला आहे. सुमारे १६० शेतकरी ऊस व इतर बागायती पिके घेत आहेत. बागायती क्षेत्र व शेतकऱ्यांचा विरोध असेल असे क्षेत्र संपादन कारायचे नाही. असे शासनाचे धोरण आहे. म्हणून सन २००४ मध्ये शेतकऱ्यांच्या या जमिनीवर संपादनाचे (७/१२ उताऱ्यावर) शिक्के पडले आहेत. तरी ते शिक्के त्वरित काढण्यात यावेत व पुन्हा संपादनासाठी मोजणीचा प्रयत्न करू नये असे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे. |