वनसंज्ञेचा प्रश्न न सोडविता शिरशिंग धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय
|
|
|
|
|
महाराष्ट्र
|
वार्ताहर सावंतवाडी वनसंज्ञेचा प्रश्न सुटत नसतानाही शिरशिंगे मध्यम धरण प्रकल्पाची उंची वाढविण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. वादग्रस्त ठेकेदार या धरणाचे काम करताना राजकीय वजन वापरत असल्याने त्याच्या हितासाठी कामाशिवाय पैसे दिल्याचे उघड झाले आहे.
आता आमदार जयंत पाटील यांचे लक्ष या प्रकल्पाकडे वेधण्यासाठी लोक इच्छुक आहेत. राजकीय वजन वापरून या धरणाच्या ठेकेदाराने आतापर्यंत काम केल्याचे शिरशिंगेमधील लोक सांगतात. सर्व पक्षांतील नेते हा ठेकेदार आपले मित्र आहेत, असे सांगत असतानाच शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी रायगडमधील धरण प्रकल्पाचे गैरव्यवहाराचे घबाड बाहेर काढले. त्यानंतर जलसंपदामंत्री सुनील तटकरे अडचणीत आले आहेत. शिरशिंगे प्रकल्पाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे रायगडमधील प्रकरण बाहेर पडण्यापूर्वीच्या काळात कार्यकारी अभियंता यांच्याकडून बिनकामाचे पैसे काढण्यासाठी प्रयत्न करत होता. त्याने चेक काढण्यास नकार देताच या ठेकेदाराने आपले वजन वापरून अवघ्या चार तासांत नवीन कार्यकारी अभियंता आंबडपाल यांची नेमणूक करून चेक काढण्यास पुढाकार घेतला होता, असे बोलले जात आहे. शिरशिंगे धरणाची निविदा वनसंज्ञा प्रश्न निकाली काढण्यापूर्वीच मंजूर करण्यात आली. वनसंज्ञेमुळे ठेकेदाराला काम करणे अवघड बनले आहे. वनसंज्ञेचा प्रश्न सुटण्यापूर्वी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेऊन ठेकेदाराला कोटय़वधीची आर्थिक वाढ निविदेशिवाय मिळवून दिली आहे. शिरशिंगे धरण प्रकल्पाची दुसऱ्या टप्प्याची निधीअभावी रद्द केलेली ४/१ ची अधिसूचना नव्याने केली जाणार आहे. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनासह नोकरीचा प्रश्न सोडविण्यास चालढकल केली जात आहे. येत्या १४ ऑगस्टपर्यंत धरणग्रस्ताच्या प्रश्नांना न्याय मिळाला नाही तर १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले जाणार आहे. जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी मंत्रालयात बैठक घेऊन प्रकल्पग्रस्त पुनर्वसनासह सर्व प्रश्न सोडविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. शिरशिंगे प्रकल्पही उंची वाढविण्याच्या मुद्दय़ावरून गाजला पाहिजे, असे लोकांचे म्हणणे आहे. |