शुभदा साने - २६ ऑगस्ट २०१२
त्यादिवशी संध्याकाळी नेहा आणि गौरव शाळेतून आले ते मुळी भांडतच! आल्या आल्या गौरव म्हणाला, ‘आई, ही नेहा बघ की गं कशी आहे..’ ‘अरे, काय केलं तिनं?’ तिला ना मला बक्षीस मिळालेलं बघवतच नाही. अगदी वाईट्ट आहे ती! ‘असं काही नाही गं आई! न बघायला काय झालं? फक्त मी काय म्हणतेय-’ ‘आई, तिचं काही ऐकू नकोस गं!’
‘गौरव, आधी मला सांग तुला कशात बक्षीस मिळालंय?’ ‘मला ना निबंध स्पर्धेत बक्षीस मिळालंय..’ ‘अरे वा! छान- पण इतकी चांगली बातमी अशी रागारागानं काय सांगतोयस?’ असं म्हणून आईनं त्याची पाठ थोपटली. तेवढय़ात नेहा म्हणाली, ‘माझीही पाठ थोपट!’ ‘तुलाही मिळालंय का बक्षीस?’ ‘मला मिळालं नाही, पण माझ्यामुळे गौरवला मिळालं.. पण तो पठ्ठय़ा मुळी हे कबूलच करीत नाही..’ ‘गौरव, तुझ्या कुठल्या निबंधाला बक्षीस मिळालं?’ ‘माझे मित्र..’ ‘विषयही छान होता की!’ ‘विषय छान होता, पण गौरवला मीच सांगितलं बरं का की नुसतं वर्गातल्या मित्रांबद्दल लिहू नको.. दुसऱ्याही मित्रांबद्दल लिही!’ ‘दुसरे मित्र? म्हणजे कुठले रे’ ‘म्हणजे कुत्रा, मांजर, घोडा.. हे सगळे आपले मित्रच असतात ना! आपल्या नेहमीच्या जीवनात आपल्याला त्यांची मदत होतच असते. शिवाय काही झाडंही आपल्या उपयोगी पडतात, तीही आपल्या मित्रासारखीच असतात. हे पॉइंट मीच सांगितले ह्य़ाला. माझ्यामुळेच याला बक्षीस मिळालं.’ ‘पण आई, वर्गातल्या माझ्या मित्रांबद्दल मी किती छान लिहिलंय..’ ‘तू फक्त तेवढंच लिहिलं असतं तर तुला मुळीच बक्षीस मिळालं नसतं.. मी जे सांगितलं त्यामुळेच..’ ‘असं जर तुला वाटत असेल तर मला यापुढे काही सांगू नकोस. मला नाही तुझ्या मदतीची जरूर..’ ‘नाहीच सांगणार.. बघू या यापुढे तुला कसं बक्षीस मिळतंय ते!’ ‘मुळीच सांगू नकोस! माझं तुझ्यावाचून काही अडणार नाही! मला एकटय़ाला सगळं जमतं!’ ‘अरे किती भांडता! मीच श्रेष्ठ आहे, मला नाही कुणाची गरज, असं कधी म्हणू नये. थांबा. तुम्हाला आता एक गोष्टच सांगते, म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ लक्षात येईल तुमच्या..’ आई आपणहून गोष्ट सांगायला तयार झालेली बघून नेहा आणि गौरव खूश झाले. गोष्ट ऐकण्याच्या तयारीत तिच्यापुढे बसले. आई गोष्ट सांगायला लागली. ‘असंच आपलं एक घर होतं- आपल्या घरासारखं. त्या घराला एक स्वयंपाकघर होतं. त्या स्वयंपाकघरात एक कपाट होतं. जाळीचं कपाट, त्या कपाटात राहायचे ते दोघं..’ ‘कपाटात राहणारे ते दोघं म्हणजे कोण असतील रे गौरव?’ ‘दोन झुरळं असतील..’ ‘नाहीतर दोन उंदीर असतील..’ ‘दोघांचीही उत्तरं साफ चुकली बरं का! त्या कपाटात राहायचे चहा आणि कॉफी. दोघांची छान मैत्री होती. अगदी गुण्यागोविंदानं राहायचे ते! पण..’ ‘पण काय? कुठे माशी शिंकली?’ ‘गर्व! गर्व आड आला बरं! दोघांच्याही मनात गर्व उत्पन्न झाला. चहाला वाटायला लागलं आपणच श्रेष्ठ! आपल्यावाचून सगळ्यांचं अडतं. सकाळी उठल्या-उठल्या आधी आपलीच आठवण येते, चहा असं सारखं बोलून दाखवायला लागला. मलाच सगळे लोक मान देतात असंही तो म्हणायला लागला.’ ‘तो असं म्हणायला लागला? मग कॉफीही काहीतरी म्हणाली असेलच की!’- गौरव. ‘हो तर! कॉफी ताठय़ानं म्हणाली, माझी चव किती छान असते. मी नसले तर घरातल्या आजीचं अजिबात चालत नाही. तिचं सगळं तंत्रच बिघडतं! तेव्हा मीच श्रेष्ठ आहे!’ ‘चहा म्हणाला, तू कसली श्रेष्ठ? तुझ्यापेक्षा मीच श्रेष्ठ आहे! आणि काय सांगायचं बघता बघता त्या दोघांचं भांडण अगदी विकोपाला गेलं!’ ‘मग काय झालं? कुणी सोडवलं ते भांडण?’ दोघांनीही आईला उत्सुकतेनं विचारलं. ‘ते भांडण दुधानं सोडवलं. तेही त्याच कपाटात वरच्या कप्प्यात राहायचं नाऽ! त्यानं ते भांडण ऐकलं आणि गंमतच केली. चहा आणि कॉफी दोघांमधूनही त्यानं आपलं अंगच काढून घेतलं! ‘मग काय झालं?’ ‘काय होणार? दोघांचाही रंग काळाकुट्ट झाला! आपला काळा रंग बघून दोघंही लाजले आणि दुधाला शरण गेले!’ ‘हंऽ हे असं आहे तर!’ ‘गौरव, नेहा या गोष्टीवरून तुम्ही काय शिकलात?’ नेहा म्हणाली ‘मी सांगते. कुणी गर्व करू नये, असं आम्ही या गोष्टीवरून शिकलो..’ ‘एवढंच?’ ‘मला अजून एक सुचतंय, आपल्याला दुसऱ्याची नेहमी मदत लागतेच. मला कुणाची जरूर नाही, असं कुणी म्हणू नये!’- गौरव तत्परतेनं म्हणाला. ‘छान! छान! या गोष्टीवरून तुम्ही चांगला धडा शिकलात. आज तुमच्या आईनं ईसापच्या आईसारखं केलं. आता वर्गातल्या मुलांसमोर तुम्ही हे नाटक करून बघा. आवडेल सगळ्यांना!’ तिथे येत हसत हसत बाबा म्हणाले. नेहा आणि गौरव त्या नाटकाचाच मग विचार करायला लागले. |