मैदान बचाव आंदोलनामागे गाळे वाचविण्याचे राजकारण?
|
|
|
|
|
ठाणे वृत्तान्त
|
वार्ताहर अंबरनाथ पूर्व विभागात रेल्वे स्थानकालगत असणारे शिवाजी उद्यानाचे मैदान वाचविण्यासाठी शहर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पुकारलेल्या आंदोलनास अंबरनाथकरांनी उदंड प्रतिसाद दिला. पालिका प्रशासन या मैदानात सध्या बहुउद्देशीय इमारत बांधत असून त्यात वाहनतळ, वाचनालय, खुले नाटय़गृह असणार आहे. मात्र हे प्रकल्प शहरात इतरत्रही होऊ शकतात. त्यासाठी मोक्याच्या जागी असणाऱ्या मैदानाचा बळी दिला जाऊ नये, अशी नागरिकांची भावना आहे.
दरम्यान मैदान बचाव आंदोलनामागे राजकारण असून पालिकेचे १३ गाळे वाचविण्यासाठीच हा सर्व खटाटोप चालला असल्याचा आरोप नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी केला आहे. उद्यानालगत असलेले हे गाळे पालिका प्रशासनाने भाडय़ाने दिले असले तरी त्याची मुदत आता संपली आहे. शिवाय हे गाळे रस्ता रुंदीकरणात जाणार आहेत. सध्या सुरू असणारे आंदोलन मैदान वाचविण्यासाठी नव्हे तर गाळे वाचविण्यासाठी असल्याचा दावाही त्यांनी केला. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने पालिकेतील सर्व विषय समित्या पटकाविलेली मनसेही मैदान बचाव आंदोलनाच्या विरोधात आहे. कोणत्याही परिस्थितीत वाहनतळासह खुले नाटय़गृह झालेच पाहिजे, असे मत बांधकाम सभापती संदीप लकडे यांनी व्यक्त केले आहे. मैदान बचावासाठी मंगळवारी झालेल्या लाक्षणिक उपोषणात महेंद्र दलाल, नरेंद्र काळे, नवीन शहा, मुकुंद जठार, सुभाष ठिपसे, शोभा शेट्टी, नगरसेवक प्रदीप पाटील आदी सहभागी झाले होते. अंबरनाथकरांनी स्वाक्षऱ्या करून आंदोलनास पाठिंबा दिला. |