प्रशालेला मिळाली ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची ‘विद्या’
|
|
|
|
|
नाशिक वृत्तान्त
|
पर्यावरणस्नेही नाशिक / प्रतिनिधी पाणीटंचाईचे संकट किती भीषण असते, याची अनुभूती ऐन पावसाळ्यात उत्तर महाराष्ट्रातील अनेक गावे व तालुके सध्या घेत आहेत. एखाद्या वर्षी पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिले तरी उन्हाळ्यात टंचाईची समस्या पिच्छा सोडत नाही. आजवर असाच अनुभव असूनही वैयक्तिक पातळीवर कोणी त्यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करताना दिसत नाही.
नाशिक जिल्ह्यातील अंजनेरीस्थित पुणे विद्यार्थी गृहाचे विद्या प्रशाला हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मात्र त्यास अपवाद ठरले आहे. दरवर्षी एप्रिल व जुलै या दोन महिन्यांत टंचाईला सामोरे जाताना टँकरवर कराव्या लागणाऱ्या २० ते २५ हजार रुपयांच्या खर्चावर संस्थेने विद्यार्थ्यांच्या मदतीने ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा प्रकल्प साकारून कायमस्वरूपी तोडगा काढला आहे. उत्तर महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांनी या पद्धतीच्या प्रकल्पांसाठी पुढाकार घेतला तर काही अंशी का होईना टंचाईच्या समस्येवर तोडगा काढता येऊ शकतो. ग्रामीण भागात आजही महिलांना पाण्यासाठी कित्येक किलोमीटर भटकंती करावी लागते. पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने या स्थितीवर मात करण्यासाठी ‘पाणी अडवा, पाणी वाचवा आणि पाणी जिरवा’ ही संकल्पना अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, याकरिता आदिवासी भागातील शिक्षक देविदास पद्मे यांनी पुढाकार घेतला. दरवर्षी विद्यालयास एप्रिल ते जुलै या तीन महिन्यांच्या काळात टंचाईला सामोरे जावे लागते. टँकरच्या माध्यमातून पाण्याची गरज भागवावी लागत असे. त्याकरिता २० ते २५ हजार रुपये खर्च येत असे. या पाश्र्वभूमीवर मुख्याध्यापक डॉ. टी. आर. गोराणे यांनी हा प्रकल्प राबविण्यास संमती दिली. संस्थेकडून रीतसर परवानगी मिळाल्याने शिक्षक व विद्यार्थी झपाटय़ाने कामाला लागले. विद्यार्थ्यांच्या मदतीने इमारतीवरील गच्ची स्वच्छ करण्यात आली. छतावरील संपूर्ण पाणी जमा करून ते टाकीत जाण्यासाठी ‘पीव्हीसी’ जलवाहिनी बसविण्यात आली. हा प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित झाला तेव्हा शिक्षक व विद्यार्थ्यांना आकाश ठेंगणे झाले. पावसाच्या पाण्याने टाकी भरल्यानंतर ‘ओव्हर फ्लो’चे पाणी शेजारील सहा बाय सहा फूट व दोन फूट खोलीच्या खड्डय़ात जिरविण्यात आले. या प्रकल्पासाठी झालेला खर्च शिक्षकांनी स्वत:च्या खिशातून आनंदाने केला. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले. तसेच दिवसाआड टँकरवर करावा लागणारा हजारो रुपयांचा खर्चही वाचविणे शक्य झाले आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या योजना मांडण्यात आल्या असून त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत. पत्र्याच्या छतावरील पाणी जमिनीखाली बांधलेल्या टाकीत जमा करून त्याचा उपयोग प्रसाधनगृह आणि १५० झाडांसाठी करण्याचा प्रयत्न आहे. तळेगाव व खंबाळा या गावात रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्यासाठी स्थानिकांना मार्गदर्शन करणे, विद्यालयाच्या रिक्त जागेत चर खोदून पाणी अडवून ते जमिनीत जिरविणे, पाण्याचे पुनर्भरण करणे व भूजल स्तर वाढविणे या योजना राबविण्याचा विद्यालयाचा मानस आहे. अतिशय कमी खर्चात दीर्घकाळ उपयोगी ठरू शकणारा हा प्रकल्प आहे. तसेच यामुळे विद्युत बचत होऊन बिलही कमी येते, पुनर्भरणामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असल्याचे विद्यालयाचे म्हणणे आहे. |