लोटे येथील कारखान्यात स्फोट; ५ जण जखमी
|
|
|
|
|
खास प्रतिनिधी, रत्नागिरी
लोटे औद्योगिक वसाहतीतील डॉ. खान इंडस्ट्रियल कंपनीमध्ये बुधवारी दुपारी झालेल्या भीषण स्फोटामध्ये पाच कामगार भाजून गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वाना ऐरोली येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, फॅक्टरीतील रिअॅक्टरच्या शीतकरणाची प्रक्रिया अचानक बंद पडल्यामुळे तापमान झपाटय़ाने वाढले. त्यामुळे हा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी होती की, रिअॅक्टरचे झाकण सुमारे १०० फूट दूर जाऊन पडले. तसेच फॅक्टरीच्या इमारतीचा केवळ सांगाडा उरला आहे. तेथे काम करत असलेले पाच जण या अपघातात गंभीर जखमी झाले.
त्यांची नावे पुढीलप्रमाणे - अमोल लोंढे (वय २६), अमित शर्मा (वय २०), अमजद खान (वय ३६), आशर इमाम (वय २६) आणि मधुकर कदम (वय ३१) चिपळूणपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावरील लोटे येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची ही वसाहत आहे. येथे रासायनिक विभागातील सर्व कारखाने आहेत. त्यापैकी अनेक ठिकाणी आवश्यक सुरक्षा योजना केली जात नाही, असे वारंवार आढळून आले आहे. गेल्या वर्षभरात या वसाहतीत झालेला हा तिसरा गंभीर अपघात आहे. |