काश्मीरप्रश्नी मध्यस्थीस रशियाचा नकार
|
|
|
|
|
पीटीआय, इस्लामाबाद
भारत, पाकिस्तान यांच्यात कळीचा मुद्दा असलेल्या काश्मीर प्रश्नावर दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्यास रशियाने स्पष्ट नकार दिला आहे. काश्मीर प्रश्न सोडविण्यास भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश सक्षम असल्याचे मत रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी गुरुवारी इस्लामाबाद येथे व्यक्त केले. सर्गेई लावरोव पाकिस्तानच्या दौऱ्यावर आले आहेत. पाकच्या परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत दुभाषीच्या माध्यमातून बोलताना लावरोव म्हणाले की, काश्मीर प्रश्नाबाबत आमच्यात सविस्तर चर्चा झाली.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी परस्परांबाबत विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी सुरू केलेले प्रयत्न स्वागतार्ह आहेत. दोन्ही देशांच्या प्रयत्नांमुळे त्यांचे संबंध आणखी बळकट होत आहेत. त्यामुळे काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी दोन्ही देश सक्षम असून तिसऱ्या कोणाचीही गरजच नसल्याचे लावरोव सांगितले. दोन्ही परराष्ट्रमंत्र्यांनी चर्चेदरम्यान विविध आंतरराष्ट्रीय मुद्दय़ांसह अफगाणिस्तान, सिरिया, लिबिया आणि इराणच्या अणू कार्यक्रमाबाबतही सविस्तर चर्चा केली. अमेरिकेकडून पाकिस्तानी प्रदेशात ड्रोनद्वारे केल्या जाणाऱ्या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत असल्याचा मुद्दा पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हिना खार यांनी चर्चेदरम्यान उपस्थित केला. त्यावर पाकिस्तानच्या भूमिकेला लावरोव यांनी पाठिंबा दर्शविला. पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचा भंग एकीकडे भारत आणि पाकिस्तान सरकार संबंध सुधारण्यावर भर देत असतानाच पाकिस्तानी रेंजर्सनी गुरुवारी काश्मीर खोऱ्यात भारत-पाक सीमेवर जोरदार गोळीबार करीत शस्त्रसंधीचा भंग केला. सकाळी ९.३० च्या सुमारास आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानच्या रेंजर्सनी भारतीय हद्दीत जोरदार गोळीबार केला. त्यावर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. सुमारे १० मिनिटे हा गोळीबार सुरू होता, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. जम्मू-काश्मीरमधील सांबा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सीमा तसेच नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी लष्कराकडून गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत २१ वेळा भारतीय सीमेत गोळीबार करून शस्त्रसंधी तोडल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. |