एक कोटीच्या दरोडय़ातील सात जणांना अटक
|
|
|
|
|
प्रतिनिधी, नाशिक गणेशोत्सवाच्या धामधुमीत पोलीस अडकल्याची संधी साधत सिडकोतील एका बिल्डरच्या कार्यालयावर भरदिवसा दरोडा टाकून तब्बल एक कोटी पाच लाखाची रोकडची लूट केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी आतापर्यंत सात संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, सोने, पाच दुचाकी व दोन चारचाकी असा एकूण ६० लाख ८८ हजार ८९० रूपयांचा ऐवज ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भरदिवसा झालेल्या या दरोडय़ाने सर्वत्र खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते. अंबड पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईत नागेश भागवत सोनवणे (२८), सुनील खोकले, दोघे रा. उपेंद्रनगर, समीर पठाण (२४), अनिल आहेर (२२) दोघे रा. उत्तमनगर, नितीन काळे (२६) रा. पाथर्डी फाटा, सागर भडांगे (२५) रा. पंचवटी, कृष्णा पाटील (२२) सिडको, या सात संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, दागिने, पाच दुचाकी व दोन चारचाकी असा एकूण ६० लाख ८८ हजार, ८९० रूपयांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे. सोनल रोहिदास भडांगे हा संशयित अद्याप फरार असून त्याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपायुक्त डी. एस. स्वामी, अंबड ठाण्याचे निरीक्षक बाळकृष्ण बोरकर, निरीक्षक के. एस. सूर्यवंशी आदी उपस्थित होते. |