‘नीट-पीजी’च्या ऑनलाइन अर्जाचे संकेतस्थळ तासाभरातच कोसळले
|
|
|
|
|
विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मनस्ताप प्रतिनिधी , मुंबई वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांवर एकामागोमाग एक याप्रमाणे संकटांना तोंड द्यावे लागते आहे. या अभ्यासक्रमासाठीच्या ‘नीट-पीजी’ या प्रवेश परीक्षेसाठी गुरुवारपासून जिथे नोंदणी सुरू होणार होती ते संकेतस्थळच तासाभरात ‘हँग’ झाल्याने विद्यार्थ्यांना मोठय़ा मनस्तापाला सामोरे जावे लागले. अखेर सायंकाळी सातच्या सुमारास संकेतस्थळ पूर्ववत झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आपले अर्ज भरता आले.
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या वर्षी प्रथमच राष्ट्रीय स्तरावर ‘नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट-पीजी’ (नीट) ही प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. साधारणपणे वैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षा जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात घेतली जाते. परंतु, या वर्षी ही परीक्षा २३ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या काळात ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. दोन महिने आधीच प्रवेश परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांवर संकट कोसळले आहे. त्यातच या परीक्षेसाठी ‘नॅशनल बोर्ड फॉर एक्झामिशन’ने ४ ऑक्टोबरपासून ऑनलाईन नोंदणी सुरू केली. परंतु, तासाभरातच संकेतस्थळ कोलमडल्याने विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागले. अर्ज भरण्याआधी विद्यार्थ्यांना अॅक्सिस बँकेत शुल्क भरून माहिती पुस्तक आणि परीक्षेचे व्हाऊचर मिळवायचे होते. या व्हाऊचरवर देण्यात आलेला सांकेतिक क्रमांक संकेतस्थळावर भरून विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पहाटेपासूनच बँकांबाहेर रांगा लावून ही व्हाऊचर्स मिळविली. पण, प्रत्यक्ष अर्ज भरण्यास सुरूवात केल्यानंतर मात्र त्यांच्या पदरी निराशा आली. कारण तासाभरातच http://www.nbe.gov.in/neetpg/ हे संकेतस्थळ ‘हँग’ झाल्याने बहुतेक विद्यार्थ्यांना अर्जच भरता आले नाही. ‘ही परीक्षा २३ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या काळातच होणार आहे. त्यासाठी प्रत्येक शहरात मर्यादित परीक्षा केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मुंबईत या परीक्षेची केवळ दोन परीक्षा केंद्रे आहेत. या केंद्रांवर दोन सत्रात मिळून दिवसभरात केवळ २४० विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार असल्याने अर्ज भरण्यास उशीर झाल्यास आपल्याला मुंबईबाहेरील परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागेल, अशी भीती आहे. त्यामुळे, होता येईल तितक्या लवकर अर्ज भरण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असे वैभव देशपांडे या विद्यार्थ्यांने सांगितले. |