शरद पवारांशी व्यावसायिक संबंध सिद्ध केल्यास मालमत्ता दान करणार
|
|
|
|
|
नितीन गडकरींचे आव्हान विशेष प्रतिनिधी , मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांशी माझे व्यावसायिक संबंध असल्याचे कोणी सिध्द केल्यास मी माझी सर्व मालमत्ता दान करीन, असे आव्हान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी गुरूवारी येथे दिले. गोसीखुर्द प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्याऐवजी काँग्रेसकडून माझी प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
सुधींद्र कुलकर्णी यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आलेल्या गडकरी यांनी खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांशी बोलताना गोसीखुर्द प्रकरणी करण्यात येत असलेल्या आरोपांचे खंडन केले. भाजप खासदार अजय संचेती हे धरणाच्या कामातील प्रमुख कंत्राटदार असून काही कंत्राटदारांसाठी गडकरींनी पत्र लिहिल्याचा आरोप करण्यात येत आहे. यासंदर्भात बोलताना गडकरी म्हणाले, सिंचन प्रकल्पाची कामे करणाऱ्या कोणत्याही कंत्राटदारांशी माझे संबंध नाहीत. या प्रकल्पावर ३०० कंत्राटदार आहेत. गोसीखुर्द प्रकल्प विदर्भातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रकल्प असून मी तो वेगाने मार्गी लावण्याच्या मागणीसाठी पाच पत्रे लिहिली आहेत. राजीव गांधींच्या कार्यकाळापासून हा प्रकल्प प्रलंबित आहे. हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्याऐवजी माझी पत्रे काँग्रेसकडून प्रसिध्दी माध्यमांना पुरविली जात आहेत. माझ्या प्रतिमेला धक्का लावण्याचे त्यांचे उद्दिष्ट असल्याचे गडकरींनी स्पष्ट केले. |