अरूण गवळीचे अपील न्यायालयाने केले दाखल प्रतिनिधी, मुंबई शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी विशेष ‘मोक्का’ न्यायालयाने सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात अरूण गवळी याने केलेले अपील मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दाखल करून घेतले. लवकरच ते सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे.
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय अनुचित आणि सारासार विचार न करता दिलेला असल्याचा दावा करीत गवळीने गेल्याच आठवडय़ात त्या विरोधात न्यायालयात अपील केले होते. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठाने हे अपील दाखल करून घेतले. विशेष ‘मोक्का’ न्यायालयाचे न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांनी गवळीसह ११ जणांना जामसंडेकर यांच्या हत्येचा कट रचणे, कटानुसार घरात घुसून त्यांची हत्या करण्याच्या आरोपाखाली दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तसेच गवळीला संघटित गुन्हेगारी म्हणून जामसंडेकर यांच्या हत्येसाठी ३० लाख रुपयांची सुपारी घेतल्याच्या आरोपाखालीही न्यायालयाने दोषी धरले होते. |