सोनियांचे जावई केजरीवालांकडून लक्ष्य
|
|
|
|
|
रॉबर्ट वढेरांनी तीन वर्षांत ३०० कोटी जमवल्याचा आरोप विशेष प्रतिनिधी , नवी दिल्ली
केंद्रातील सत्ताधारी यूपीए आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी रीयल इस्टेट क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी कंपनी डीएलएफच्या जिवावर कुठलाही व्यवसाय न करता तीन वर्षांमध्ये ३०० कोटी रुपयांची मालमत्ता जमविल्याचा सनसनाटी आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे सहकारी अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी येथे केला. थेट सोनिया गांधींवर आरोपांचे शिंतोडे उडाल्यामुळे काँग्रेसने सर्वशक्तिनिशी त्याचे खंडन केले. डीएलएफनेही हे आरोप फेटाळून लावले.
वढेरा यांच्यावरील आरोपांची निष्पक्ष चौकशी करू शकेल अशी देशात कोणती संस्था आहे, असा सवाल केजरीवाल यांनी केला. केजरीवाल यांचे आरोप म्हणजे क्षुद्र संधिसाधूपणा असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. येत्या १० ऑक्टोबर रोजी आणखी एका राष्ट्रीय नेत्याच्या आर्थिक घोटाळ्याचे प्रकरण उघड करण्याची घोषणा केजरीवाल यांनी या प्रसंगी केली. ही संधी साधून भाजपने सोनिया गांधींचे निवासस्थान, १० जनपथ हे लुटीचा अड्डा बनल्याचा आरोप करीत या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली. रॉबर्ट वढेरा हे काँग्रेसशासित राज्यांचे जावई बनल्याचा टोला बाबा रामदेव यांनी लगावला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी केजरीवाल यांचे सहकारी प्रशांत भूषण यांनी केली आहे. डीएलएफने कुठलेही तारण नसताना वढेरा यांना एवढे मोठे बिनव्याजी कर्ज का दिले, असा सवाल ज्येष्ठ विधिज्ञ व केजरीवाल यांचे सहकारी प्रशांत भूषण यांनी केला. वढेरा यांनी २००७ साली पाच कंपन्यांची स्थापना केली. त्यात त्यांच्या पत्नी प्रियांका गांधी काही काळ संचालिका होत्या आणि कालांतराने त्यांनी हे पद सोडून दिले. वढेरा आणि त्यांची आई या कंपन्यांमध्ये संचालक होते, असा दावा भूषण यांनी केला. वढेरा यांना स्वस्तात जमिनी दिल्याबद्दल हरयाणा, दिल्ली आणि राजस्थानच्या काँग्रेसशासित सरकारांनी डीएलएफसाठी भूसंपादन करण्यात पुढाकार घेतल्याचा आरोप भूषण यांनी केला. काँग्रेसच्या सरकारांनी डीएलएफला मदत केल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, असा दावा करीत केंद्रीय राज्यमंत्री राजीव शुक्ला यांनी वढेरा यांचा बचाव केला. व्यवसायासाठी प्रत्येकाला कर्ज घ्यावे लागते, असे त्यांनी सांगितले. हिमाचल आणि गुजरातमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी जनतेचे लक्ष वेधण्यासाठी हे आरोप करण्यात आल्याचा दावा काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. केजरीवाल यांनी या आरोपांविषयी सीबीआयला पत्र लिहावे आणि सीबीआयने चौकशी करण्याचे टाळल्यास पुराव्यांनिशी न्यायालयात धाव घ्यावी, असा सल्ला डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला. वढेरा-डीएलएफ व्यवहार काय झाला? *उत्तर भारतातील बांधकाम व्यवसायातील डीएलएफ कंपनी बडे प्रस्थ * या कंपनीकडून वढेरा यांनी घेतले ६५ कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज * कंपनीतील मालमत्ता खरेदीतून तीन वर्षांत त्यांनी केली ३०० कोटींची कमाई * डीएलएफने वढेरांना ३५ कोटींची मालमत्ता पाच कोटी रुपयांना विकली * या कंपन्यांमार्फत डीएलएएफचा वढेरांना पैसे देण्याचे प्रयत्न * काँग्रेसशासित राज्यांची डीएलएफवर मेहेरनजर, कोटय़वधींचे भूखंड कवडीमोलाने कंपनीला बहाल * या व्यवहारातून वढेरांनी मालमत्ता गोळा केल्याचे केजरीवालांकडून सूचित |