मुंबईत गुरुवारपासून रिक्षाभाडे १५, तर टॅक्सीचे १९ रुपये प्रतिनिधी / मुंबई
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या रिक्षा व टॅक्सीच्या भाडेवाढीला अखेर मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने शुक्रवारी मंजुरी दिली आहे. ही भाडेवाढ ११ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. रिक्षाची तीन, तर टॅक्सीची दोन रुपयांनी भाडेवाढ करण्यात आली आहे. मंगळवापर्यंत नवी भाडेपत्रिका तयार करण्यात येणार असून, बनावट भाडेपत्रिका तयार करणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ करण्याची शिफारस करणारा अहवाल डॉ. हकीम यांच्या एकसदस्यीय समितीने राज्य सरकारला सादर केला होता.
या अहवालामध्ये काही सुधारणा करीत राज्य शासनाने मंजुरीसाठी तो परिवहन प्राधिकरणाकडे पाठविला होता. या अहवालावर शुक्रवारी प्राधिकरणाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार मुंबई महानगर प्रदेशातील (मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि वसई-विरार) सीएनजी इंधनावरील टॅक्सीचे भाडे (काळी-पिवळी) १९ रुपये करण्यात आले आहे. पुढील प्रत्येक टप्प्यासाठी १२.३५ रुपये भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. रिक्षाचे किमान भाडे १५ रुपये तर पुढील प्रत्येक टप्प्यासाठी ९.८७ रुपये मोजावे लागणार आहेत. सीएनजी इंधनावरील कूल कॅब टॅक्सीचे भाडे २३ रुपये करण्यात आले असून पुढील टप्प्यासाठी १५.४२ रुपये आकारण्यात येणार आहेत. कल्याण-भिवंडी क्षेत्रातील पेट्रोल इंधनावरील रिक्षाचे भाडे १९ रुपये असून पुढील टप्प्यासाठी १२.४७ रुपये आकारण्यात येणार आहेत. ही वाढ करताना टॅक्सी आणि रिक्षामधील मीटर्समध्ये आवश्यक ती सुधारणा होईपर्यंत सुधारित दरभाडे पत्रिका वापरण्यात येणार असून लवकरच ती परिवहन विभागामार्फत संबंधित चालकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी ४५ दिवसांमध्ये आपल्या मीटरमध्ये तसे बदल करून घ्यायचे आहेत, असे परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरे यांनी सांगितले. बनावट कार्ड वापरून किंवा ई-मीटरमध्ये फेरफार करून ग्राहकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला तर त्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार दंड आणि परवाना निलंबनाची कारवाई करण्याबरोबरच फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे मोरे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे टॅक्सी आणि रिक्षाचालकांकडून ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी काही निर्णय शासनाने घेतले आहेत.
दृष्टिक्षेपात भाडेवाढ * टॅक्सी-रिक्षाचा पहिला टप्पा १.६ किमीचा होता. त्याऐवजी पहिला टप्पा ही संकल्पना बंद. * रिक्षा आणि टॅक्सीसाठी २०० ऐवजी १०० मीटरचा टप्पा; मात्र भाडेवाढ किलोमीटरवर * इलेक्ट्रॉनिक मीटर बंधनकारक * चालकाचे ओळखपत्र दिसेल अशा रीतीने प्रदर्शित करणे सक्तीचे. * रात्रीच्या वेळी २५ टक्केच अधिक भाडे * प्री- पेड योजनेतील ४० ते ५० टक्क्यांपर्यंत असलेले जादा आकार आता कमाल ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. * कूल कॅबचे किमान भाडे २३ रुपये. |