नक्षलवाद्यांच्या धमक्यांना न जुमानता तब्बल ९ उमेदवार रिंगणात उतरणार
|
|
|
|
|
एटापल्ली तालुक्यात पंचायत समितीची पोटनिवडणूक खास प्रतिनिधी चंद्रपूर नक्षलवाद्यांकडून वारंवार मिळालेल्या धमक्यांना न जुमानता एटापल्ली तालुक्यात होणाऱ्या पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत तब्बल ९ उमेदवारांनी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने खवळलेल्या नक्षलवाद्यांनी आता या उमेदवारांचा प्रचार केला, तर हातपाय तोडू, अशी धमकी देणारी पत्रके ठिकठिकाणी टाकणे सुरू केले आहे.
सहा महिन्यांपूर्वी नक्षलवाद्यांनी दबाव टाकल्यामुळे गडचिरोली जिल्ह्य़ातील एटापल्ली तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सक्रीय असलेल्या बहुतांश लोकप्रतिनिधींनी पदांचे राजीनामे दिले होते. यामुळे रिक्त झालेल्या पंचायत समितीच्या दोन जागांसाठी जिल्हा प्रशासनाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानंतर लगेच नक्षलवाद्यांनी ठिकठिकाणी पत्रके टाकून यात सहभागी होऊ नये, असे आवाहन जनतेला केले होते. त्यामुळे गेल्या पंधरवडय़ांपासून या तालुक्यात दहशतीचे वातावरण आहे. नक्षलवाद्यांच्या या धमकीला भीक न घालता राजकीय पक्षांनी उमेदवार ठरवणे सुरू केले होते. हे लक्षात येताच नक्षलवाद्यांनी संभाव्य उमेदवारांची नावे असलेली पत्रके टाकून या सर्वाना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे या उमेदवारांनी सुद्धा माघार घेतली. तरीही राजकीय पक्षांनी वेगळी शक्कल लढवत काही अपक्ष उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. यादिवशी दोन जागांसाठी ९ उमेदवार रिंगणात राहणार, हे स्पष्ट झाल्याने संतापलेल्या नक्षलवाद्यांनी आता या उमेदवारांचा प्रचार कुणी करू नये, यासाठी धमकीची पत्रके टाकणे सुरू केले आहे. काल शुक्रवारी रात्री नक्षलवाद्यांनी एटापल्ली गावातील गुड्ड हॉटेलसमोर एक पत्रक टाकले. यात तालुक्यातील राजकीय वर्तुळात सक्रीय असलेले घिसू दुर्वा, संजय चरढुके, रमेश गंपावार, श्रीकांत गंपावार, बाबुराव गंपावार, असेन्ना मेडीवार, मनोहर बोरकर या नेत्यांनी या उमेदवारांच्या प्रचाराला अजिबात जाऊ नये, असे आवाहन केले आहे. हे आवाहन पाळले नाही तर या स्थानिक नेत्यांचे हातपाय तोडून त्यांना जनतेच्या न्यायालयात शिक्षा दिली जाईल, असा इशारा दिला आहे. या धमकीमुळे या तालुक्यात सध्या भीतीचे वातावरण आहे. नक्षलवादी रोज पत्रके टाकत असल्याने निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या नऊ उमेदवारांनी अद्याप प्रचाराला सुरुवात केली नाही. नक्षलवाद्यांची धमकी असताना सुद्धा या उमेदवारांनी निवडणूक लढण्याची तयारी दाखवल्याने प्रशासनाने या सर्वाना मदत करण्याचे ठरवले आहे. या उमेदवारांमध्ये केवळ भाजपचे उमेदवार पक्षाच्या चिन्हावर रिंगणात आहेत. इतर राजकीय पक्षांनी अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत करण्याची नवीन खेळी यावेळी खेळली आहे. या तालुक्यात काही ग्रामपंचायतीच्याही पोटनिवडणुकासाठी १४ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. |