‘जेम्स बॉंड’ झाला पन्नास वर्षांचा..!
|
|
|
|
|
प्रतिनिधी मुंबई त्याची एकामागोमाग एक मोजून पडलेली तीन पावले. आणि गर्रकन वळून हातातले पिस्तुल घेऊन आपल्याकडे रोखून बघणारा बॉंड.. जेम्स बॉंड! पाहताक्षणी काळजाचा ठाव घेणारा जगभरातील प्रेक्षकांचा लाडका जेम्स बॉंड शुक्रवारी पन्नास वर्षांचा झाला.
अतिशय चलाख असलेले ब्रिटिश गुप्तहेराचे हा काल्पनिक पात्र गेली पन्नास वर्ष आपल्या बॉंडपटातून प्रेक्षकांवर गारुड करून आहे. जेम्स बॉंडला पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर आणणाऱ्या आल्बर्ट ब्रोकोली यांनी त्याचे वर्णन ‘सोन्याचे अंडे देणारे बदक’ असे केले होते. आजवर आलेल्या २२ बॉंडपटांनी ५ अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्त कमाई केली आहे. १९६२ मध्ये याच दिवशी ‘डॉ. नो’ हा पहिला बॉंडपट प्रदर्शित झाला होता. इयान फ्लेमिंग या लेखकाने १९५३ साली ‘जेम्स बॉंड’ या काल्पनिक ब्रिटिश गुप्तहेराला शब्दरुप दिले. त्यानंतर त्याने जेम्स बॉंडवर १२ कादंबऱ्या आणि दोन लघुकथासंग्रह लिहिले. त्याच्या या बॉंडला पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर आणले ते हॅरी सॉलमन आणि आल्बर्ट ब्रोकोली यांच्या इऑन प्रॉडक्शनने. सीन कॉनरी या अभिनेत्याने पहिला बॉंड साकारला. बॉंडची हुशारी, त्याच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अद्ययावत असलेल्या गाडय़ा आणि त्याची इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स या सगळ्यांनी लोकांना अक्षरश वेड लावले. आजवर सहा अभिनेत्यांनी ‘जेम्स बॉंड’ पडद्यावर गाजवला. येत्या २३ ऑक्टोबरला बॉंडपटांच्या मालिकेतला तेविसावा बॉंडपट ‘स्कायफॉल’ प्रदर्शित होणार आहे. बॉंडपटांच्या या करिष्म्याला सलाम करण्यासाठी जगभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ‘स्कायफॉल’ या चित्रपटातील संकल्पनेवर आधारित गाण्याची चित्रफित ग्रॅमी पुरस्कार विजेत्या अॅडलेने प्रदर्शित केली तर बॉंडच्या आवडत्या अॅस्टन मार्टिनसह बॉंडपटांमधून गाजलेल्या आलिशान गाडय़ांनी लंडनचा पाईनवुड स्टुडिओ भरून गेला आहे. हॉलिवुडमध्ये बॉंडपटातील गाजलेल्या गाण्यांची मैफल रंगली आहे. या सगळ्यापेक्षाही लक्षवेधी ठरेल तो ‘एव्हरीथिंग ऑर नथिंग द अनटोल्ड स्टोरी ऑफ ००७’ हा लघुपट. बॉंडला जिवंत करणारा लेखक इयान फ्लेमिंग आणि निर्माताद्वयी हॅरी सोलमन, आल्बर्ट ब्रोकोली या तिघांची कहाणी उलगडणारा हा लघुपट. पडद्यावर चित्तथरारक खेळ करणाऱ्या जेम्स बॉंडची पडद्यामागची कहाणीही तितकीच चित्तथरारक आहे. |