गोसीखुर्द प्रकल्पासाठी मुख्यमंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचीही पत्रे
|
|
|
|
|
नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
पीटीआय नवी दिल्ली गोसीखुर्द प्रकल्पाच्या संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही पत्रव्यवहार केला असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.
गडकरी या प्रकल्पाबाबत पाठविलेल्या पत्रावरून काँग्रेसने त्यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. त्यामुळे गडकरी यांनीही, चव्हाण आणि ठाकरे यांनी पत्र पाठविल्याचे स्पष्ट केले आहे. गोसीखुर्द प्रकल्पाच्या समर्थनार्थ पत्र लिहून आपण कोणता गुन्हा केला. हा प्रकल्प आपल्या मतदारसंघात येत आहे. त्या प्रकल्पाला विलंब होत असल्याच्या तक्रारी तेथील जनतेने आपल्याकडे केल्या. पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरेच नव्हेत, तर केंद्रीयमंत्री मुकुल वासनिक यांनीही प्रकल्पाच्या समर्थनार्थ पत्रे लिहिली असल्याची आपली माहिती आहे, असे गडकरी म्हणाले. काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी गडकरी यांच्यावर तीव्र टीका केली होती. सदर प्रकल्पाबाबत गडकरी यांना एवढे स्वारस्य का, असा सवाल करून द्विवेदी यांनी, गडकरी आणि प्रकल्पाच्या कंत्राटदाराचे संबंध असल्याचा आरोप केला. वर्षांनुवर्षे रेंगाळलेला प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा यासाठी पत्र लिहिणे हा गुन्हा आहे का, असा आश्चर्ययुक्त सवाल गडकरी यांनी केला. शेतकरी आत्महत्या करीत असताना आपण मूग गिळून गप्प बसल्यास आपण दोषी ठरतो, असेही ते म्हणाले. आपण केवळ एकच पत्र लिहिले नाही तर पाच पत्रे लिहिली आहेत आणि आणखी १० पत्रे लिहिणार आहोत, असेही गडकरी म्हणाले. महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार आहे, त्यांनीच कंत्राटे दिली आहेत, त्यांनीच प्रकल्पाला विलंब लावला आहे, प्रकल्पाचा खर्च त्यांच्यामुळेच वाढला आहे, असे असताना हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्याची मागणी केली तर आपल्यावरच ठपका ठेवला जातो, असेही गडकरी म्हणाले. |