केजरीवाल पागल, आरोपांमागे आरएसएस, भाजप - ठाकरे
|
|
|
|
|
वार्ताहर संगमनेर अरिवद केजरीवाल एखाद्या ‘पागल’ माणसाप्रमाणे बरळण्याचे काम करत आहेत. केजरीवाल आरएसएसचे पिल्लू असल्याचे लक्षात आल्यानेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांच्यापासून फारकत घेतली असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी संगमनेर येथे केले.
नाशिक येथील कार्यक्रमआटोपून पुण्याकडे जात असताना काल रात्री उशिरा ते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी थांबले होते. संगमनेरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्री थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, पंचायत समितीच्या सभापती सुरेखा मोरे, नगराध्यक्ष दिलीप पुंड, बाजार समितीचे सभापती अनिल देशमुख, काँग्रेसचे अकोले तालुकाध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे, मधुकरराव नवले, दुर्गाताई तांबे यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना ठाकरे म्हणाले की, काँग्रेसची विकासात्मक घोडदौड पहावत नसल्याने काही लोक खोडसाळपणे पक्षावर आणि पक्षनेतृत्वावर बेछूट आरोप करत आहेत. आरएसएस व भाजपाचे हे षडम्यंत्र आहे. केजरीवालही त्यांचेच प्रतिनिधी आहेत. मात्र, काँग्रेसजन अशा खोटय़ानाटय़ा आरोपांना थारा देणार नाही. आपला पक्ष संयम ठेवणारा आहे. मात्र, आपल्या नेतृत्वावर खोटे आरोप होत असतील तर कार्यकर्त्यांनी विधायक मार्गाने निषेध करून खरी बाब जनतेसमोर आणली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. मंत्री थोरात म्हणाले की, सोनियांचे नेतृत्व देशाला पुढे नेणारे आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांसाठी काही कटू निर्णय घेतले, मात्र देशाच्या प्रगतीसाठी ते आवश्यक होते. परंतु विरोधकांच्या खोडसाळ आरोपांमुळे देशाच्या प्रगतीपुढेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्षाची प्रतिमा डागाळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. डॉ. तांबे म्हणाले की, काँग्रेसविरोधात देशभर कारस्थान रचले जात आहे. भाजपा रोज नवीन आरोप करत आहे. त्यामुळे जिद्द व आत्मविश्वासाने पक्षाची भूमिका जनतेसमोर नेण्याचे आव्हान कार्यकर्त्यांसमोर आहे. मधुकर नवले यांनी सूत्रसंचालन केले, तर थोरात कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी आभार मानले. |