फ्रान्सचे हॅरोशे व अमेरिकेचे वाइनलँड यांना भौतिकशास्त्राचे नोबेल
|
|
|
|
|
स्टॉकहोम, ९ ऑक्टोबर/एपी फ्रान्सचे सर्ज हॅरोशे व अमेरिकेचे डेव्हिड वाइनलँड यांना यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. पुंज भौतिकी (क्वांटम फिजिक्स) क्षेत्रातील संशोधनासाठी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. अतिशय अचूक घडय़ाळे तसेच अतिवेगवान संगणक तयार करण्याच्या प्रक्रियेत त्यांच्या संशोधनाचा प्रत्यक्ष वापर करण्यात आला आहे.
कणांचे गुणधर्म अभ्यासण्याच्या नवीन पद्धती त्यांनी शोधून काढल्या आहेत. पुंज कणांना नष्ट न करता त्यांचे निरीक्षण करता येऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले. ही बाब पूर्वी अशक्य वाटत होती ती त्यांनी करून दाखवली. रॉयस स्वीडिश अॅकेडमी ऑफ सायन्सेस या संस्थेने म्हटले आहे की, जेव्हा पुंज कण बाह्य़ जगात आंतरक्रिया करतात तेव्हा त्यांचे गुणधर्म बदलतात हे या दोघांनी दाखवून दिले आहे. पुंज कण हा जेव्हा वेगळा होतो त्या स्थितीत अणु व इलेक्ट्रॉन किंवा फोटॉन यांचे गुणधर्म चमत्कारिकरीत्या बदलतात. त्यामुळे त्याचे द्वैती अस्तित्व तयार होते तो कण तरंगांच्या स्वरूपात एकाचवेळी दोन ठिकाणी असतो. जेव्हा हा कण दुसऱ्या कणाशी आंतरक्रिया करतो तेव्हा त्याचे गुणधर्म बदलतात. या दोघा वैज्ञानिकांनी स्वतंत्रपणे काम केले असून त्यांनी तयार केलेल्या स्वयंसिद्ध प्रयोगशाळा पद्धतींमुळे त्यांना पुंज अवस्थांचे निरीक्षण व मापन करता आले असे अॅकेडमीने म्हटले आहे. |