आशा भोसले, उषा मंगेशकर यांचे जबाब नोंदविणार
|
|
|
|
|
वर्षां भोसले आत्महत्या प्रक रण प्रतिनिधी, मुंबई प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची मुलगी वर्षां यांच्या आत्महत्येप्रकरणी आशा भोसले व त्यांची बहीण उषा मंगेशकर यांच्यासह मंगेशकर व भोसले कुटुंबियांचे जबाब पोलीस नोंदवून घेणार आहेत. वर्षां यांच्या पार्थिवावर मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मोजके नातेवाईक उपस्थित होते. पेडर रोडवरील प्रभुकुंज या निवासस्थानी वर्षां यांनी सोमवारी पिस्तुलाने गोळी झाडून आत्महत्या केली होती.
गावदेवी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. वर्षांच्या शरीरातील काही भाग तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. सोमवारी दुपारी पोलिसांनी घरात प्रवेश केला तेव्हा घरातला टीव्ही पॉज अवस्थेत आढळून आला. तसेच पाण्याचा भरलेला ग्लासही शेजारीच ठेवलेला आढळला होता. टीव्ही पॉज झाला तेव्हा रात्री सव्वाबाराची वेळ होती. गोळी झाडून घेताना वर्षांंने टीव्हीचा आवाज मोठा करून ठेवला असावा, अशी शक्यता गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोणंदकर यांनी व्यकत केली आहे. दरम्यान, वर्षांने आत्महत्या का केली त्याचा उलगडा अद्याप झालेला नाही. पुण्यात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्या मानसिक रुग्ण नव्हत्या, असेही पोलिसांनी सांगितले आहे. शवविच्छेदन अहवालात डोक्यात गोळी लागल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ते पिस्तुल कुणाच्या नावावार आहे, ते जबाब नोंदविल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. याप्रक रणी पोलीस आशा भोसले, उषा मंगेशकर यांच्यासह वर्षां यांची मावस बहीण रचना शहा (मीना खडीकर यांची कन्या), आशाताईंच्या घरी काम करणारी बाई दीपाली माने आणि वाहनचालक विजय यांचेही जबाब नोंदविण्यात येणार आहेत. वर्षां या शेवटच्या क्षणी कुणाशी बोलल्या का हे तपासण्यासाठी घरातल्या दूरध्वनीचा कॉल रेकॉर्डही तपासला जाणार आहे. विशेष म्हणजे प्रभुकुंज इमारतीत सीसीटीव्ही नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. |