गणेशोत्सवात १.६४ लाख पिशव्या जमा संदीप आचार्य ,मुंबई महाराष्ट्रात शंभर टक्के स्वैच्छिक रक्तदानाचे उद्दिष्ट गाठण्याची जंगी तयारी आरोग्य विभागाने सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गणेशोत्सवाच्या काळात अवघ्या एका महिन्यात ‘राज्य रक्त संक्रमण परिषदे’ने राज्यव्यापी मोहीम राबवून तब्बल १,६४,६४७ पिशव्या रक्त जमा केले आहे. ‘रक्ताचे नाते रक्ताशी’ जोडण्याच्या आरोग्य विभागाच्या या उपक्रमामुळे राज्यातील गरजू रुग्णांना रक्ताची चणचण आता भासणार नाही.
संपूर्ण देशातील रक्ताची गरज, पुरेसे रक्त उपलब्ध होणे तसेच सुरक्षित रक्त याला प्राधान्य देतानाच केंद्र शासनाने स्थापन केलेल्या ‘राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदे’ने देशासाठी रक्तदानाचे धोरण ठरवताना शंभर टक्के स्वैच्छिक रक्तदानाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. आजघडीला या उद्दिष्टाच्या जवळ पोहोचलेले महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. देशात पश्चिम बंगाल, गुजरात, हरयाणा अशा काही मोजक्याच राज्यांमध्ये स्वैच्छिक रक्तदान चांगल्या प्रकारे होत असले तरी महाराष्ट्राच्या आसपासही पोहोचणे या राज्यांना आजघडीला शक्य नाही. गेल्या वर्षी राज्यात १३.६० लाख रक्ताच्या पिशव्या गोळ्या करण्यात आल्या असून यातील जवळपास नव्वद टक्के रक्तदान स्वैच्छिक होते. आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी आणि खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव टी. सी. बेंजामिन यांनी महाराष्ट्रात आगामी वर्षांत शंभर टक्के स्वैच्छिक रक्तदानाचे उद्दिष्ठ गाठण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्या दृष्टिकोनातून ‘राज्य रक्त संक्रमण परिषदे’ सहाय्यक संचालक डॉ. संजयकुमार जाधव यांनी राज्यातील स्वयंसेवी संस्था, विश्वस्त मंडळे, राजकीय नेते, कॉर्पोरेट कंपन्या तसेच धार्मिक गुरुंच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात रक्तदान शिबीरे भरविण्याची योजना आखली आहे. या शंभर टक्के स्वैच्छिक योजनेचाच एक भाग म्हणून टी. सी. बेंजामिन यांनी गणेशोत्सवाच्या काळात दीड लाख रक्ताच्या पिशव्या जमा करण्याची जबाबदारी ‘राज्य रक्त संक्रमण परिषदे’वर सोपवली होती. त्यानुसार राज्यातील २६१ रक्तपेढय़ांच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या कालावधीत २४४७ रक्दान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यातून तब्बल १,६४,६४७ रक्ताच्या पिशव्या जमा झाल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. प्रमुख्याने मुंबई, ठाणे, पुणे व नाशिक येथे गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणेत रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. मात्र, आगामी काळात जिल्हा स्तरावरून थेट ग्रामपंचायतींपर्यंत रक्तदानाच्या जाळ्याचा विस्तार करण्याचा निर्णय आरोग्यमंत्र्यांनी घेतल्याचेही त्यांनी सांगितले. प्रामुख्याने ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये रक्ताची चणचण भासते ती या विक्रमी रक्तदानामुळे भासणार नाही, असा विश्वास बेजामिन यांनी व्यक्त केला. |