वृत्तसंस्था , कोलकाता
जगाच्या कानाकोपऱ्यात संवाद साधण्यासाठी सर्वाधिक पसंतीचा मार्ग झालेला ईमेल हा चाळिशीत पदार्पण करीत असून दोन दशकांपूर्वी भारतात जेमतेम एक हजार लोकांकडून वापरल्या जाणाऱ्या ई मेलसेवेचा पसारा आता सर्वव्यापी झाला आहे. मित्रामित्रांतील संवादातील सहजतेपासून सरकारी कामकाजात सुटसुटीतपणा आणणारा ई मेल आज देशातील १५ कोटी नेटकरांचा ‘संपर्कप्रमुख’ बनला आहे.
जन्मकथा ई मेलची
अमेरिकेतील संगणकतज्ज्ञ रे टॉमलिन्सन यांनी ४० वर्षांपूर्वी ईमेल हे संपर्काचे माध्यम तयार केले आणि अवघे जग त्या माध्यमाने कवेत घेतले. ऑक्टोबर १९७१ मध्ये टॉमलिन्सनने हे सॉफ्टवेअर विकसित केले आणि एका संगणकातून दुसऱ्या संगणकाकडे संदेश पाठविला गेला. विशेष म्हणजे हे दोन्ही संगणक एकमेकांना खेटूनच होते तरी इंटरनेटच्या माध्यमातून पहिला संदेश पाठविण्याच्या या प्रयोगाच्या यशामुळे संशोधकांचा हुरूप वाढला. देशातील १५ कोटी नेटकरांचा ‘संपर्कप्रमुख’!
जगातील अगदी सुरुवातीच्या अशा अॅरपानेट या संगणकीय नेटवर्कच्या माध्यमातून हे संदेशवहन झाले. टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेसच्या तंत्रज्ञानविषयक संघटनेचे सल्लागार आणि ‘टाटा मूलभूत संशोधन संस्थे’तील माजी प्राध्यापक सुगत संन्याल यांनी त्या काळच्या आठवणीत रमताना सांगितले की, ‘त्या काळी अनेक भारतीय विद्यार्थी अमेरिकेत उच्चशिक्षण आणि संशोधनासाठी राहात होते. अॅरपानेट आणि बिटनेट या संगणकीय नेटवर्कच्या माध्यमातून त्यांनीही ईमेलद्वारे परस्परसंपर्काचा अनुभव घेतला होता. अमेरिकेतील सर्व विद्यापीठांमधील तसेच शैक्षणिक संस्थांमधील ई मेल संपर्कासाठी बिटनेट हे नेटवर्क वापरले जात होते.’ ‘टाटा मूलभूत संशोधन संस्थे’तील सैद्धांतिक भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. राजीव गवई हे अशा विद्यार्थ्यांपैकी एक होते! हजारो मैलांवरील आपल्या सहलेखकांशी अॅरपानेट आणि बिटनेटद्वारे संपर्क साधण्यातल्या सोयीचा अनुभव त्यांनी घेतला होता. ते १९८६ मध्ये भारतात परतले तेव्हा अमेरिकेतील आपल्या सहकाऱ्यांशी पत्राद्वारे, फॅक्सद्वारे संपर्क साधणे त्यांना भाग पडले. त्यानंतर त्यांनी सुगत संन्याल, के. पी. सिंग आणि एन. के. मंडल अशा आपल्या सहकाऱ्यांना अमेरिकेत ईमेलने संपर्क किती गतिमान आणि सोयीचा झाला आहे, ते सांगितले. आपल्या देशातही ई मेलची सोय व्हावी, यासाठी मग या सर्वच प्राध्यापक संशोधकांत एकमत झाले. त्यांनी मग ‘विद्यानेट’ हे नेटवर्क स्थापण्याचे ठरविले आणि त्यासाठी जीनिव्हातील ‘सर्न’ (युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लीअर रिसर्च) या संस्थेचे साह्य घेतले. त्यानंतर या संशोधकांनी इलेक्ट्रॉनिक खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली तेव्हा हा विभागही ‘अर्नेट’ (एज्युकेशन अँड रीसर्च नेटवर्क) हा प्रकल्प तडीस नेत असून तोही शैक्षणिक संस्थांत ईमेलसंपर्काचे कार्य करणार आहे, हे त्यांना समजले. त्यातूनच पुढे ईमेलची सुविधा निर्माण झाली. आजघडीला ईमेल हा संदेशवहनाचा भारतातील सर्वात सहज, जलद आणि पारदर्शी माध्यम बनला आहे. जवळपास १५ कोटी भारतीय ईमेलचा वापर करतात, असेही आता आढळून आले आहे. |