पुणे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे गवसले : शिंदे
|
|
|
|
|
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली पुण्यात १ ऑगस्ट रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अतिशय महत्त्वाचे धागेदोरे गवसले असून लवकरच प्रमुख संशयितांना अटक केली जाण्याची शक्यता असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मात्र, या प्रकरणी चौकशी निर्णायक टप्प्यात पोहोचल्यामुळे सर्व तपशील उघड करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिंदे यांनी देशाच्या गृहमंत्रीपदाची १ ऑगस्ट रोजी सकाळी सूत्रे घेताच त्याच सायंकाळी पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणत त्यांचे ‘स्वागत’ करण्यात आले होते. पुणे बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासात बरीच प्रगती झाली असून ही चौकशी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे याबाबतची माहिती आपण देऊ शकणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले. देशाचे गृहमंत्री झाल्यानंतर शिंदे आज प्रथमच पत्रकारांना सामोरे गेले. गृहमंत्रीपदाची सूत्रे घेतल्यापासून देशाच्या विविध भागांना दिलेल्या भेटी आणि गृहमंत्री म्हणून केलेल्या परदेश दौऱ्यांची त्यांनी माहिती दिली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत बोलताना भाजपचे सर्वोच्च नेते लालकृष्ण अडवाणी यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याची प्रशंसा केल्याबद्दल शिंदे यांनी अडवाणींचे आभार मानले. विरोधी पक्षात असूनही सरकारच्या चांगल्या कार्याला संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर पावती देऊन विधायक अडवाणींनी राजकारण केल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले. पंजाबमध्ये शीख दहशतवाद पुन्हा डोके वर काढत असल्याची बाब त्यांनी अंशत मान्य केली. पंजाबमध्ये होत असलेल्या कारवायांना जम्मू आणि काश्मीरमधून घुसखोरांची साथ मिळत आहे काय हे तपासून बघण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. परदेशांमध्येही शीख फुटीरवाद्यांची जमवाजमव चाललेली आहे. सुवर्णमंदिरातील लष्करी कारवाईत ठार झालेल्या दहशतवाद्यांना शहीद बनवून त्यांचे स्मारक बनविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दहशतवादाच्या झळा सोसणाऱ्या पंजाबवर पुन्हा अशी स्थिती उद्भवणे उचित आहे काय, याचे संबंधितांनी आत्मचिंतन करावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. |