पाणी मराठवाडय़ाला, फायदा राष्ट्रवादीला
|
|
|
|
|
खास प्रतिनिधी, मुंबई
आंदोलन, मोर्चे, धरणे असे काहीही नसतानाही नगरचे पाणी मराठवाडय़ाला सोडण्यामागे राष्ट्रवादीचे निवडणुकीचे राजकारण असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मराठवाडय़ात पक्षाची ताकद वाढविण्याच्या उद्देशाने पाण्याचा मुद्दा राष्ट्रवादीने खुबीने उचलला आहे. धरणे, रास्ता रोको, तोडफोड आंदोलन झाल्यावरच नाईलाजाने पाणी सोडण्याची वेळ आतापर्यंत सरकारवर आली होती. कमी पाऊस झाल्याने यंदा मराठवाडय़ात परिस्थिती गंभीर असली तरी पाण्यासाठी कोठेही आंदोलन सुरू झालेले नाही. मागणीही पुढे आलेली नाही. तरीही मंत्रिमंडळाच्या बैठकीत जयदत्त क्षीरसागर आणि राजेश टोपे हे राष्ट्रवादीचे मराठवाडय़ातील मंत्री आक्रमक का झाले, असा प्रश्न काँग्रेसच्या नेत्यांना पडला आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी रात्री काँग्रेसच्या काही ज्येष्ठ मंत्र्यांबरोबर राजकीय परिस्थितीबाबत आढावा घेतला. या बैठकीत मराठवाडय़ासाठी पाणी सोडण्याबाबतच्या प्रश्नावर चर्चा झाली. पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठवाडय़ात जास्त जागाजिंकण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर काँग्रेसकडे मराठवाडय़ात तेवढय़ा ताकदीचे नेतृत्व उरलेले नाही. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मर्यादा आहेत. काँग्रेसकडे नेतृत्वाचा अभाव असताना निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. त्यातूनच राष्ट्रवादीने हातपाय पसरण्याकरिता पाण्याचा मुद्दा हाती घेतला आहे. नगरचे पाणी मराठवाडय़ात सोडण्यात येणार त्या भागातील मतदारसंघांत गेल्या वेळी राष्ट्रवादीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. याशिवाय बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीला आपला प्रभाव कायम राखायचा आहे. गेल्या वेळी बीडमध्ये सहापैकी पाच जागा राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. नगर जिल्ह्यातील पाणी मराठवाडय़ाला सोडण्यास बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे-पाटील हे काँग्रेसचे मंत्री फारसे अनुकूल नव्हते. पण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड, आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते या नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनुकूल भूमिका घेतली. राष्ट्रवादीने निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ही खेळी केली आहे. |