के. एल. बिष्णोई विधी पदवी प्रकरण:
|
|
|
|
|
राकेश मारिया यांच्यासह पाच आयपीएस अधिकाऱ्यांना ‘क्लीन चिट’ ब्रिजेश सिंग-मनोज राठोड यांना समज देण्याची शिफारस! प्रतिनिधी, मुंबई ज्येष्ठ आयपीएस अधिकारी के. एल. बिष्णोई यांना वाचविण्यासाठी खोटे अहवाल सादर केल्याचा आरोप असलेले ‘एटीएस’ प्रमुख राकेश मारिया, संजय सक्सेना, नवल बजाज, विश्वास नांगरे-पाटील आणि पंकज गुप्ता अशा पाच आयपीएस अधिकाऱ्यांना राज्याचे माजी पोलीस महासंचालक के. सुब्रमण्यम् यांनी आपल्या चौकशीत ‘क्लीन चिट’ दिली आहे.
त्याच वेळी सारासार विचार न करता निष्काळजीपणे हे प्रकरण हाताळल्याचा ठपका ठेवत अतिरिक्त पोलीस आयुक्त ब्रिजेश सिंग आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक मनोज राठोड यांना मात्र सल्लावजा सूचना देण्याची शिफारसही त्यांनी अहवालाद्वारे राज्य सरकारकडे केली आहे. जुलै महिन्यात हा मोहोरबंद अहवाल सादर करण्यात आला होता. एकाच वेळी ‘एटीएस’ प्रमुखांसह सात आयपीएस अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश न्यायालयाने दिल्याने पोलीस वर्तुळात खळबळ माजली होती. त्यामुळेच सुब्रमण्यम् यांच्या अहवालात काय असणार याबाबत सगळ्यांना कुतूहल होते. बिष्णोई यांनी परीक्षेला न बसताच कायद्याची पदवी मिळविल्याबाबत चौकशीचे प्रकरण विनाकारण लांबविल्याप्रकरणी सिद्धार्थ विधी महाविद्यालयाच्या माजी उपप्राचार्या चित्रा साळुंखे यांनी याचिका करून या अधिकाऱ्यांची ‘सीबीआय’ चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र पोलीस संचालकांद्वारे आधी ही चौकशी करण्यात यावी, अशी विनंती खुद्द महाधिवक्त्यांनी न्यायालयाकडे केल्यानंतर न्यायालयाने पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले होते. साळुंखे यांना बुधवारी हा अहवाल देण्यात आला. बिष्णोई तसेच सिद्धार्थ विधी महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य आय. ए. इनामदार यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार कारवाईला सुरुवात करण्यात आल्याची खोटी माहिती २००६ मध्ये उपायुक्त असलेल्या ब्रिजेश सिंग यांनी पत्राद्वारे साळुंखे यांना कळविली होती. मात्र हा दिशाभूल करणारा आणि खोटा असून निष्काळजीपणे पाठविला गेल्याचे सुब्रमण्यम् यांनी सिंग यांच्यावर ठपका ठेवताना म्हटले आहे. मात्र सिंग यांनी हे हेतुत: केले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. नागरी हक्क संरक्षण विभागाचे अधीक्षक म्हणून त्या वेळी कार्यरत असलेल्या राठोड यांनी साळुंखे यांच्या तक्रारीबाबत तत्कालीन उपायुक्त नवल बजाज यांनी पाठविलेला अहवाल तसाच पुढे राष्ट्रीय महिला आयोगाकडे पाठविला, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. या अहवालावर वरिष्ठ आणि तज्ज्ञांचे मत न घेताच थेट आयोगाकडे पाठविला. त्यांनी केवळ टपालाची भूमिका बजावल्याचेही सुब्रमण्यम् यांनी राठोड यांच्यावर ठपका ठेवताना म्हटले आहे. मारिया आणि अन्य अधिकाऱ्यांविरुद्ध केलेल्या आरोपांप्रकरणी कुठलाही सबळ पुरावा पुढे आलेला नसल्याचेही सुब्रमण्यम् यांनी अहवालात म्हटले आहे. |