पेंटोग्राफला चिकटून तरुणाचा मृत्यू
|
|
|
|
|
प्रतिनिधी ,मुंबई उपनगरी सेवेसाठी आवश्यक असलेल्या ओव्हरहेड तारांमध्ये २५ हजार व्होल्ट विद्युतप्रवाह वाहत असल्यामुळे गाडीच्या टपावरून प्रवेश करू नये, ही वेळोवेळी केली जाणारी सूचना अव्हेरून प्रवास करणाऱ्या एका तरुणाचा पेंटोग्राफला चिकटल्याने बुधवारी मृत्यू झाला. छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या हार्बर मार्गावरील गोवंडी स्थानकात ही घटना घडली. यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक दुपारी तब्बल अर्धा तास विस्कळीत झाली होती.
दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास गोवंडी स्थानकामध्ये आलेल्या उपनगरी गाडीच्या टपावरून प्रवास करत असलेला एक तरुण पेंटोग्राफला चिकटला. त्याचा जागीच मृत्यू झाला. यामुळे या गाडीच्या मागे असलेल्या चार गाडय़ाही जागीच थांबविण्यात आल्या. तरुणाचा जळलेला मृतदेह खाली उतरविण्यात आल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू झाली. या तरुणाचे नाव कळू शकलेले नाही. मात्र यामुळे विस्कळीत झालेली हार्बरची वाहतूक सायंकाळपर्यंत पूर्वपदावर आली नव्हती. |