भुजबळांच्या ‘हेक्स वर्ल्ड’मध्ये ४० अधिकाऱ्यांना सदनिका
|
|
|
|
|
१५ ऑक्टोबपर्यंत नावे जाहीर करण्याचा सोमय्यांचा इशारा वार्ताहर , नांदेड
सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या मालकीच्या खारघर येथील ‘हेक्स वर्ल्ड’मध्ये बांधकाम खात्याच्या ४० अधिकाऱ्यांना आलिशान सदनिकांची भेट मिळाल्याचा सनसनाटी आरोप भाजपचे आमदार किरीट सोमय्या यांनी केला. या सर्व अधिकाऱ्यांची नावे १५ऑक्टोबपर्यंत मुंबईत जाहीर केली जातील, अशी घोषणाही त्यांनी केली. नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरात दाखल झालेल्या सोमय्या यांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला. भुजबळ हे महाराष्ट्रातील रॉबर्ट वढेरा आहेत या आरोपाचा पुनरुच्चार करताना सोमय्या यांनी भुजबळांवर हल्ला चढविला.
नवी मुंबईत भुजबळ यांच्या मालकीच्या कंपनीला जी जागा मिळाली तेथे आता ‘हेक्स वर्ल्ड’ नावाचा प्रकल्प उभारला जात आहे. याच ठिकाणी बांधकाम खात्यातल्या ४० अधिकाऱ्यांना आलिशान सदनिकांची भेट मिळाली आहे. जागा मिळावी यासाठी बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचा मोबदला म्हणून या सदनिका देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही भेट मिळाली त्यांची नावे आपण १५ ऑक्टोबरला मुंबईत जाहीर करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.भुजबळ यांच्या वांद्रा येथील परवेज कन्स्ट्रक्शन कंपनीला अशाच प्रकारे दीडशे कोटींची जमीन मिळाली. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात घोटाळे करणाऱ्या भुजबळ यांना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार का अभय देत आहेत? असा सवाल त्यांनी केला. मोफत, नाममात्र दरात जमिनी लाटण्याचा हा प्रकार गंभीर असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाकडून याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. मी केलेले आरोप खोटे आहेत, असे गोलगोल उत्तर देऊन भुजबळ व राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपली जबाबदारी टाळता येणार नाही. चौकशी न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला. अशोक चव्हाणांवरही टीका सोमय्या यांनी अशोक चव्हाण यांच्यावरही टीकास्त्र सोडले. कोळसा घोटाळ्यात चव्हाणांचे हात काळे झाले आहेत. ज्या सनफ्लॅग कंपनीला अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना १४ कोळसा खाणी देण्याची शिफारस केली होती, त्यात ४९ टक्के बेनामी गुंतवणूक आहे. ही गुंतवणूक कोणाची? याचा खुलासा चव्हाण यांनी करावा, अशी मागणी त्यांनी केली. |