श्री शिवछत्रपती विद्यालयातील कबड्डीपटू विद्यार्थिनींची नेत्रदीपक कामगिरी
|
|
|
|
|
खोपोली, ११ ऑक्टोबर के.टी.एस.पी. मंडळ संचालित देवन्हावा येथील श्री शिवछत्रपती विद्यालयातील कबड्डीपटू विद्यार्थिनींनी खालापूर तालुक्यातून प्रथमच जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. अलिबागआ वास येथे पायका तथा पंचायत युवा खेळ अभियानांतर्गत नुकत्याच संपन्न झालेल्या कबड्डी स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केल्यामुळे श्री शिवछत्रपती विद्यालयातील कबड्डीपटू विद्यार्थिनी मालती मुसळे, रेश्मा वाघमारे, वृषाली महाबळे यांची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्य़ाच्या मुलींच्या संघात निवड करण्यात आली आहे.
किशोरी गटातील कबड्डी स्पर्धा जालना येथे सुरू असून या स्पर्धेत शाळेची विद्यार्थिनी प्रगती मुसळे ही रायगड जिल्ह्य़ाच्या संघातून खेळत आहे. रोहा तालुक्यातील चिल्हेस्थित श्रमिक विद्यालयात ९ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. शाळेतील कबड्डीपटू विद्यार्थिनी शलाका देशमुख व मालती मुसळे यांच्या नेतृत्वाखाली अनुक्रमे १४ वर्षांखालील व १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने या जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांकासह अजिंक्यपद पटकावले आहे. मुलींचे हे दोन्ही संघ आगामी विभागीय कबड्डी स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्य़ाचे नेतृत्व करणार आहेत. खालापूर तालुक्यामध्ये आजपर्यंत कोणत्याही शाळेतील मुलींच्या संघाने कबड्डी स्पर्धेत जिल्हा व राज्यस्तरापर्यंत मजल मारली नव्हती. ती नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या श्री शिवछत्रपती विद्यालयातील या विजेत्या कबड्डीपटू विद्यार्थिनींना क्रीडाशिक्षक नेमाणे, भला व रवींद्र म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले होते. तालुक्याच्या शाळेच्या व संस्थेच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या या विजेत्या कबड्डीपटू विद्यार्थिनीचे संस्थेचे अध्यक्ष-विद्यमान नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर, शालेय समितीचे अध्यक्ष तेंडुलकर, मुख्याध्यापक व्ही. पी. पाटील यांनी खास अभिनंदन केले असून आगामी स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. |