महापालिकेचा रुग्णसेवेचा नवा वसा; खासगीकरणातून धर्मशाळा बांधणार!
|
|
|
|
|
संदीप आचार्य, मुंबई
महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून उपचारासाठी मुंबईत महापालिका रुग्णालयांमध्ये त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या जे.जे. रुग्णालयासह परळच्या टाटा कॅन्सर रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसोबतच्या नातेवाईकांच्या निवासासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारीमधून काही ‘धर्मशाळा’ बांधण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या दालनात आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत धर्मशाळा बांधण्याला प्राधान्य देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार पालिकेच्या जागेत धर्मशाळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या मुंबईत जे. जे. रुग्णालयाच्या परिसरात तसेच सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या आवारातही संत गाडगेबाबा धर्मशाळा आहे. याशिवाय परळला नाना पालकर स्मृती समितीच्या धर्मशाळेसह मुंबईतील एकूण सर्व धर्मशाळांमध्ये मिळून १३१० खोल्या उपलब्ध आहेत. कर्करोगासारख्या असाध्य आजारांवरील उपचारांसाठी मुंबईत येणारे रुग्ण व त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांची संख्या लक्षात घेतल्यास किमान दोन हजार खोल्यांची गरज आहे. मुख्य सचिव बांठिया यांच्याकडे झालेल्या बैठकीत अतिरिक्त महापालिका आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी मुंबई आरोग्य अभियानविषयक सादरीकरण केले. त्या वेळी, केवळ मुंबईतच नव्हे तर राज्यभरात रुग्ण व नातेवाईकांसाठी धर्मशाळा (राहण्याची व्यवस्था) उभारण्याची भूमिका मुख्य सचिव बांठिया यांनी मांडली. यासाठी धर्मादाय संस्था तसेच कॉर्पोरेट कंपन्यांनी पुढाकार घ्यावा व त्यांना शासनाच्या जागा उपलब्ध करून द्याव्या असेही त्यांनी सांगितले. पालिका व खासगी संस्थांच्या सहभागातून मुंबईत महापालिकेच्या जागांवर धर्मशाळा बांधता येईल, असे मनीषा म्हैसकर यांनी सुचविले. काही ठिकाणी पालिका स्वखर्चाने धर्मशाळा बांधेल व त्याच्या देखभालीची जबाबदारी कॉर्पोरेट कंपन्या अथवा संस्थांनी घ्यावी याबाबतची योजना लवकरच तयार केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. वृद्धांसाठी रुग्णालय उभारणी तसेच मानसिक आजारासाठी लवकरच हेल्पलाइन सुरू करण्यात येईल असेही त्या म्हणाल्या. पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनीही याकामी पुढाकार घेतला असून पालिकेच्या आरोग्य प्रकल्पांमध्ये सेवाभावी संस्थांनी जबाबदारी स्वीकारल्यास त्यांना सर्व सहकार्य करण्याची त्यांची भूमिका असल्याचे मनीषा म्हैसकर यांनी सांगितले. समाजात अनेक दानशूर व्यक्ती आहेत व त्यांना आरोग्य क्षेत्रात काम करायचे आहे. मात्र लालफितीच्या कारभारामुळे अनेकदा या संस्था पुढे येत नाहीत. मात्र शंभर टक्केसेवाभावीवृत्तीने प्रकल्प राबविणाऱ्या संस्थांना पालिकेकडून कोणत्याही दिरंगाईचा अनुभव येणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. |