राजधानी दिल्लीत स्फोट करण्याचा ‘मुजाहिदीन’चा कट उधळला
|
|
|
|
|
विशेष प्रतिनिधी , नवी दिल्ली पुण्यात १ ऑगस्ट रोजी सायंकाळी झालेल्या कमी क्षमतेच्या चार बॉम्बस्फोटांमागे असद खान आणि इम्रान खान यांचा सहभाग असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. इक्बाल आणि रियाझ भटकल यांच्या निर्देशावरून ते दिल्लीत बॉम्बस्फोट घडविण्यासाठी आले होते. त्यांना ४० वर्षीय राजूभाई हा स्थानिक अतिरेकी सहकार्य करणार होता. राजूभाईने असद आणि इम्रानची दिल्लीतील पूल प्रल्हादपूर येथे राहण्याची व्यवस्था केली होती.
या दोघांना राजूभाईचा परिचय नव्हता. महाराष्ट्रातील इंडियन मुजाहिदिनचे काही साथीदार लवकरच दिल्लीत दाखल होणार होते. १ ऑक्टोबर २०१२ रोजी दिल्लीच्या निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर त्यांचा सहकारी सईद फिरोज (३८ वर्षे, रा. शुक्रवार पेठ, पुणे) याला दिल्ली पोलिसांनी अटक केली. त्याच्यापाशी असलेल्या बॅगेत १ किलो स्फोटके आणि दोन डिटोनेटर्स सापडल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला. या तिन्ही संशयितांची कसून चौकशी केली असता असद खानची तीन वर्षांपूर्वी फय्याझ कागझीशी भेट झाली आणि त्यानेच असद खानची इक्बाल आणि रियाझ भटकल यांच्याशी भेट घालून दिली. पुण्यातील स्फोटांचे कारस्थान ८ जून २०१२ रोजी येरवडा तुरुंगात ठार झालेल्या इंडियन मुजाहिदिनचा अतिरेकी कतील सिद्दिकीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी येरवडा तुरुंगात किंवा पुणे कोर्टाच्या परिसरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचण्यात आला. पण नंतर हा बेत रद्द करण्यात आला. त्यानंतर कातील सिद्दिकीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले शरद मोहोळ आणि अशोक भालेराव यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याचे ठरले. पण त्यांच्या नातेवाईकांची ओळख पटणे शक्य न झाल्याने पुणे किंवा मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याचा निर्णय भटकळबंधूंनी घेतला. त्यानुसार असद खान याच्या औरंगाबादेतील कटकट गेट येथील टूर अॅण्ड ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात इम्रान खान आणि सईद फिरोजची भेट झाली. सईद फिरोजने जुलैच्या उत्तरार्धात पुण्यातील कासारवाडी येथे एक सदनिका भाडय़ाने घेतली. काही दिवसांनी तिथे अन्य दोन अतिरेकी राहावयास आले. या अतिरेक्यांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत. सईद फिरोजने त्या दोघांना बुधवार पेठेतील इलेक्ट्रॉनिक पेठेत नेऊन आयईडी तयार करण्यासाठी लागणारे डिजिटल घडय़ाळे, सर्किट बोर्डस् आणि अन्य साहित्य खरेदी केले. इम्रान खानने बॉल बेअरिंग्ज नांदेडहून आणले होते. त्यानंतर ते बॉम्ब पेरण्याच्या उद्देशाने मुंबईला जाऊन आले. पण बॉम्बस्फोट पुण्यातच व्हावेत, असा निर्णय भटकळबंधूंनी घेतला. १ ऑगस्ट रोजी या अतिरेक्यांनी पुण्यातील फडके हौद येथे जाऊन तीन सायकली खरेदी केल्या. त्या चालवत आणून डेक्कन बस स्टॅण्ड येथे ठेवण्यात आल्या. सायंकाळी त्यांनी आयईडी असलेल्या रकसॅक्स घेऊन बस स्टॅण्डवरील सायकली जंगली महाराज रोडवर नेल्या आणि तिथे आणखी आयईडी पेरून ते घटनास्थळाहून पसार झाले. या स्फोटांसाठी त्यांना हवाला मार्गाने तीन लाख रुपये देण्यात आले होते. त्यानंतर भटकळबंधूंच्या निर्देशांवरून ते दिल्लीत दाखल झाले. या अतिरेक्यांच्या गटातील राजूभाई आणि अन्य सदस्यांची ओळख पटविण्याची मोहीम राबविण्यात येत असून संशयितांची चित्रे तयार करण्यात आल्याचे नीरजकुमार यांनी सांगितले. |