‘जिहादी’ मानसिकतेतूनच असदने स्फोट घडविले!
|
|
|
|
|
पोलीस अधिकाऱ्यांचा दावा प्रतिनिधी, औरंगाबाद पुणे बॉम्बस्फोटातील सूत्रधार आरोपी असद खान याचे कुटुंबीय ७ वर्षांपूर्वी (२००५मध्ये) औरंगाबादजवळील नायगाव येथे स्थलांतरित झाले.
या कुटुंबाने एक नवाच कोश स्वत:भोवती विणला. संपर्काच्या मर्यादा धार्मिक कट्टरतेशी जोडल्या गेल्या, अशी काही निरीक्षणे या प्रकरणाच्या तपास करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नोंदविली आहेत. कटातला असदचा सहभाग ‘अर्थ’कारणाशी संबंधित नाही. त्याची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने केवळ ‘जिहादी’ मानसिकतेतूनच असदने पुणे स्फोट घडवून आणला, असे सूत्रांनी सांगितले. औरंगाबादजवळील सावंगी चौकातून नायगावकडे जाणारा रस्ता वळतो. दीड वर्षांपूर्वी असद व त्याच्या कुटुंबीयांनी येथे जागा घेतली. तो व इरफान दोघे मिळून औरंगाबादला भूखंड विक्रीचा व्यवसाय करायचे. दीड महिन्यापूर्वी असदची सासू आजारी असल्याचे कारण देत तो नगर येथे गेला होता. तत्पूर्वी त्याने कटकट गेटजवळील त्याचे टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सचे दुकान बंद केले. हे दुकान केवळ दिखाव्याचा भाग होता, असे पोलीस सांगतात. दुपारी दीडच्या नमाजापूर्वी दुचाकीवरून जाणारा असदचा भाऊ हुसेन म्हणाला, ‘माध्यमांनी रंगविलेले चित्र कदाचित वेगळे असेल. तो येत नाही, तोपर्यंत फारसे बोलायचे नाही.’ थोडय़ाशा चर्चेनंतर त्याने असद व कुटुंबाविषयी माहिती दिली. तो म्हणाला, ‘असद २००४, २००७ व २०११मध्ये हज यात्रेसाठी जाऊन आला होता. असदने औरंगाबाद येथील मिटमिटा भागात भूखंड खरेदी-विक्रीचा व्यवसाय केला. तो जोपर्यंत परत येत नाही, तोपर्यंत यावर फारसे बोलता येणार नाही.’ नायगावच्या तवक्कलनगर भागातील असदचे घर इतर घरांच्या तुलनेत चांगलेच मजबूत आहे. संरक्षक भिंत जणू तटबंदी वाटावी. लोखंडी दरवाजे व मोजक्याच खिडक्या अशी घराची बाह्य़रचना कुटुंबीयांचा ‘कोश’ अधोरेखित करणारी आहे. घराच्या झडतीच्या वेळी ही निरीक्षणे पोलिसांनी नोंदविली. असदचे वडील जमशीदअली खान यांची दोन्ही मूत्रपिंडं खराब झाली. त्यांच्यावर घरातच ‘डायलिसिस’चा उपचार होतो. असदचा भाऊ हुसेन वडिलांच्या सेवेत असतो. तो बारावीपर्यंत शिकला आहे. असदने मात्र बी.कॉम.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. पुण्यात संगणकाचाही अभ्यासक्रम त्याने पूर्ण केला. मूळ लातूरचे हे कुटुंब औरंगाबाद जिल्ह्य़ात स्थलांतरित झाल्यानंतर औरंगाबाद- नाशिक मार्गावरील जांभळा येथे ते राहात होते. नंतर ते नायगाव येथे स्थलांतरित झाले. असदचे इतर नातेवाईक उच्च्चशिक्षित असल्याचेही पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. असदच्या शेजारी राहणाऱ्या एकाने सांगितले, या कुटुंबीयांचा कोणालाही त्रास नव्हता. वागणूकही ‘नेक’ होती. घर ते मशीद असेच दैनंदिन व्यवहार असल्याने असद असे काही करेल, असे वाटत नव्हते. |