अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे बारामतीत अस्वस्थता; इंदापुरात सावध भूमिका
|
|
|
|
|
तानाजी काळे
इंदापूर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर सुरुवातीचे काही दिवस, आता पुढे काय? हा प्रश्न स्वत:ला विचारत, थांबा आणि वाट पाहाच्या अस्वस्थतेत थांबलेल्या बारामती तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या व अजित पवारांच्या निकटवर्ती कार्यकर्त्यांत आता दिवसागणिक अस्वस्थता वाढू लागली असून, दीर्घकाळ सत्तेच्या माहोलात अजित पवारांच्या निकट वावरलेल्या कार्यकर्त्यांना अजित पवार सत्तेच्या बाहेर असल्याचे शल्य आता चांगलेच जाणवू लागले असून, केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या विषयाला अत्यंत मुत्सद्दीपणे तातडीने पूर्णविराम दिल्याने व प्रसारण माध्यमांनीही गेले अनेक दिवस पवार विरुद्ध पवार या विषयाला अधिक प्रसिद्धी दिल्याने बारामतीत अधिकच अस्वस्थता जाणवत आहे.
तर, बारामतीच्या बांधावर इंदापूर तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पवारांचे बांधावरचे राजकीय विरोधक राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व इंदापूर तालुक्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सावध भूमिका घेतली असून हर्षवर्धन पाटील यांनी या विषयावर बोलणे टाळले असले तरी येत्या २० ऑक्टोबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री ‘कर्मयोगी व नीरा- भीमा’ सहकारी साखर कारखान्यांच्या ऊस गळीत हंगाम प्रारंभासाठी इंदापूर तालुक्यात येणार असल्याने मुख्यमंत्र्यांच्या इंदापूर दौऱ्याकडे आता पुणे जिल्ह्य़ाचे लक्ष लागले आहे. सध्या पुणे जिल्ह्य़ात खंडकरी शेतकरी जमीन वाटप प्रश्न, तसेच पूर्व पुणे जिल्ह्य़ावर असलेले दुष्काळाचे सावट, ऊस कारखानदारांना या टंचाईच्या काळात जाणवणाऱ्या समस्या आदी प्रश्न ऐरणीवर असून पुणे जिल्ह्य़ात सध्या केवळ हर्षवर्धन पाटील हेच एकमेव मंत्री असल्याने व काँग्रेसचे पुणे जिल्ह्य़ाचे संपर्कमंत्री म्हणून कामकाज त्यांच्याकडेच असल्याने व पुणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्रिपद सध्या रिक्त असल्याने श्री. पाटील यांच्याकडे कार्यकर्त्यांचा ओघ वाढला असल्याचे दिसून येत आहे. अशातच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सिंचनाचा मुद्दा पुन्हा लावून धरल्याने काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकीय तणाव वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय सख्य उभ्या महाराष्ट्राला ज्ञात असले, तरी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व पाटील यांचे सौहार्दपूर्ण राजकीय व व्यक्तिगत संबंध असल्याने पवार व पाटील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर व अनेक कार्यक्रमात एकत्र दिसतात. पाटील हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निकट असल्याने काँग्रेस- राष्ट्रवादीतील सध्या राज्यात व केंद्रात आघाडी असतानाही ताणलेले संबंध आगामी निवडणुकांपूर्वी निवळण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांच्यावर अधिक जबाबदारी पडण्याची शक्यता आहे. |