नवरात्र उत्सवाच्या स्वागतासाठी रायगडातील बाजारपेठा सजल्या
|
|
|
|
|
प्रतिनिधी अलिबाग येत्या मंगळवारपासून नवरात्रोस्तवाला सुरुवात होते आहे. नऊ दिवस मोठय़ा भक्तिभावाने घराघरातून हा उत्सव साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने लागणाऱ्या वस्तूंनी जिल्ह्य़ातील बाजारपेठा सजल्या असून बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे.
मंगळवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोस्तवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्ह्य़ातील सर्व प्रमुख बाजारपेठांमधे ग्राहकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली. नवरात्रोस्तवाच्या निमित्ताने नऊ दिवस देवीची वेगवेगळ्या रूपांत पूजा बांधली जात असते. त्यासाठी लागणाऱ्या वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. छेटे नारळ, नक्षीदार घट, आरशांचे तोरण, धान्याच्या दाण्यांची पाकिटे यांसारख्या वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. नवरात्रोस्तवात गरबा आणि दाडींयाची मोठी धूम असते. यासाठी आकर्षक पारंपरिक पोशाखांना मोठी मागणी असते. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन सध्या घाऊक आणि किरकोळ दुकानदारांनी नवरात्री पोशाख विक्रीसाठी आणले आहेत. यात एम्ब्रॉयडरी असलेल्या, आरसे लावलेल्या आणि जरदोसी काम केलेल्या डिझायनर कपडय़ांचा समावेश आहे. नवरात्रात नऊ दिवस उपास करण्याची प्रथा रूढ आहे. यासाठी उपासाचे पदार्थ, बटाटय़ाचे, रताळ्याचे पदार्थ बाजारात दाखल झाले आहेत. विविध प्रकरची ज्वेलरीनेही बाजारपेठा सजल्या असून या खरेदीठी ग्राहकांची गर्दी होत आहे. |