वाळू माफियांची नायब तहसीलदाराला जिवंत जाळण्याची धमकी
|
|
|
|
|
वार्ताहर जळगाव वाळूची अवैध वाहतूक रोखणाऱ्या नायब तहसीलदाराला वाळू माफियांकडून जिवंत जाळण्याची धमकी दिल्याचा प्रकार जिल्ह्यातील अमळनेर येथे घडला. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
अमळनेर येथे बोरी नदीतून अवैधपणे वाळू वाहून नेण्याचे काम रिक्षा तसेच डम्परमधून केले जात असल्याच्या अनेक तक्रारी येत असल्याच्या पाश्र्वभूमीवर तहसील प्रशासनाकडून वाळू तस्करांविरोधात अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत रविवारी सकाळी अकराच्या सुमारास खळेश्वर मंदिर परिसरात नायब तहसीलदार अशोक जगदेव हे उभे असता वाळूने भरलेला एक टेम्पो त्यांनी अडविला. टेम्पोचालक अब्बास हुसेन मेवासी याच्याकडे जगदेव यांनी वाळू वाहतुकीसंदर्भात विचारणा केली असता दोघांमध्ये वाद वाढला. अब्बासने दुसऱ्या साथीदारासह जगदेव यांना टेम्पोमध्ये बसवून दमदाटी केली. जिवंत जाळण्याची धमकीही देण्यात आल्याची तक्रार जगदेव यांनी पोलिसांकडे केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून एकाला अटक करण्यात आली. |