डीएलफ-वढेरा प्रकरणाला नवे वळण
|
|
|
|
|
* खमक्या खेमकांची तडकाफडकी बदली * हरयाणा सरकार टीकेचे धनी पीटीआय, चंडिगढ
सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी डीएलएफ कंपनीशी केलेल्या व्यवहारांची चौकशी करण्याचा खमकेपणा दाखवणारे हरयाणाचे वरिष्ठ आयएएस अधिकारी अशोक खेमका यांची तडकाफडकी बदली करण्याचा हरयाणा सरकारचा निर्णय मंगळवारी चांगलाच अंगलट आला. खेमकांच्या बदलीचे पडसाद राजधानीतही उमटले. भाजप आणि अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या टीकामुळे काँग्रेसला बचावात्मक पवित्रा स्वीकारावा लागला.
आधीच दिवाळखोरीत असलेल्या डीएलएफ कंपनीकडून वढेरा यांना मिळालेले बिनव्याजी कर्ज, वढेरांनी कवडीमोल भावाने विकत घेतलेल्या जमिनी आणि केलेले आतबट्टय़ाचे व्यवहार या सर्व पाश्र्वभूमीवर केजरीवाल यांनी गेल्याच आठवडय़ात वढेरांवर आरोपांची तोफ डागली होती. त्याची दखल घेत हरयाणाचे जमीन खरेदी-विक्री व्यवहाराच्या नोंदणी विभागाचे महानिरीक्षक अशोक खेमका यांनी चार जिल्ह्य़ांतील महसूल आयुक्तांना वढेरा आणि डीएलएफ कंपनीतील जमिनीच्या व्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तसेच या व्यवहारात अफरातफरी आढळल्यास त्याची माहिती तत्पर संबंधित जिल्हाधिकारी व आयुक्तांना देण्याचे आदेश देत व्यवहार रद्दबातल ठरवण्याच्या सूचनाही खेमका यांनी दिल्या होत्या. मात्र, खेमकांच्या या खमकेपणावर हरयाणा सरकारनेच पाणी फेरत त्यांची सोमवारी रात्री हरयाणा बियाणे महामंडळाच्या महासंचालकपदावर तडकाफडकी बदली केली. या बदलीमुळे चिडलेल्या खेमका यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहित आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली. २० वर्षांत ४३ बदल्या.. खेमका यांनी झालेल्या बदलीचा निषेध नोंदवत आपण करत असलेले काम योग्य होते व त्यात कोणताही बडेजाव नव्हता असा दावा केला आहे. आपल्या कार्यशैलीमुळे आपण कायमच चर्चेत राहिलो असून नोकरीच्या २० वर्षांच्या कालावधीत ४३ बदल्या झाल्या असल्याचे खेमका यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. आपण ज्या जिल्ह्य़ांतील जमिनीच्या व्यवहारांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, त्यात कोटय़वधी रुपयांचे व्यवहार अगदी बिनदिक्कत आणि थोडक्या कालावधीत झाले आहेत. त्यामुळेच त्यांची चौकशी करणे योग्य ठरते. मात्र, आपल्या कार्यवाहीला राजकीय रंग दिले गेले आहेत, आणि म्हणूनच आपली बदली झाली असल्याचा आरोप खेमका यांनी केला आहे. जमिनीचा व्यवहार रद्द खेमका यांनी अन्यत्र बदली होऊन जाताना मनेसर-शिकोहपूर मार्गावरील साडेतीन एकर जमिनीचा सुमारे ५८ कोटी रुपयांचा वढेरा-डीएलफ यांच्यातील व्यवहार रद्दबातल ठरवला. या व्यवहारात कायद्याचे पालन केले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. हुडांकडून बचाव दरम्यान, खेमकांच्या बदलीमुळे टीकेचे धनी बनलेले हरयाणाचे मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुडा यांनी खेमका यांची बदली हा राज्य सरकारच्या अखत्यारीतील मुद्दा असल्याचे सांगत निर्णयाचे समर्थन केले. भाजप आक्रमक खेमकांच्या बदलीचे पडसाद राजधानी दिल्लीत उमटले. वढेरांचे पाप दडवण्यासाठी हरयाणा सरकारने यूपीएच्या सूचनेवरून खेमका यांची बदली केल्याचा आरोप भाजपने केला. काँग्रेसचा इन्कार काँग्रेसने मात्र भाजपच्या आरोपाचा इन्कार करत खेमका यांची बदली राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय असून त्यांच्यासारख्या इमानदार अधिकाऱ्याकडून डीएलफ व्यवहारांची चौकशी झाली तर स्वागतच आहे अशी प्रतिक्रिया नोंदवली. |