कोकणात सिंचन प्रकल्प आणि पर्यटनाला चालना देण्याची गरज - विभागीय आयुक्त नाहटा
|
|
|
|
|
खास प्रतिनिधी , रत्नागिरी
कोकण विभागातील चार जिल्ह्य़ांमध्ये सिंचन क्षमतेत वाढ आणि पर्यटनाच्या विकासावर भर देण्याची गरज कोकणचे विभागीय आयुक्त विजय नाहटा यांनी व्यक्त केली आहे.समतोल प्रादेशिक विकास उच्चस्तरीय समितीची बैठक गेल्या रविवारी कोकण भवन येथे झाली. ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने त्या पूर्वी, गेल्या शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्य़ांमधील विकासाच्या प्रश्नांबाबत बैठक घेऊन विविध क्षेत्रांतील जाणकारांची मते अजमावली.
कोकण भवन येथे झालेल्या बैठकीत या समितीपुढे सादरीकरण करताना कोकणातील वैशिष्टय़पूर्ण शेती, फळबाग लागवड, औद्योगिक विकास इत्यादींचा ऊहापोह नाहटा यांनी केला. ते म्हणाले की, ठाणे जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात सूर्या व भातसा नदीवर मोठे प्रकल्प बांधण्यात येत आहेत. ते अनुक्रमे २०१५ व २०१४ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. रायगड जिल्ह्य़ात एक मोठा पाटबंधारे प्रकल्प, तीन मध्यम प्रकल्प आणि एकतीस लघु पाटबंधारे प्रकल्प असून त्यांची सिंचन क्षमता २४ हजार हेक्टर आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ात ४ मध्यम पाटबंधारे प्रकल्प आणि ९५४ लघु पाटबंधारे प्रकल्प असून त्यांची एकूण सिंचन क्षमता ३९ हजार हेक्टर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात दोन मोठे व चार मध्यम पाटबंधारे प्रकल्प असून, त्यांची एकूण सिंचन क्षमता ८३ हजार हेक्टर आहे. पण वाढते नागरीकरण आणि औद्योगिकीकरण लक्षात घेता आणखी मोठे सिंचन प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. तसेच हे प्रकल्प विहित वेळेत पूर्ण केले जातील, याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. या विभागाला लाभलेल्या समुद्र किनाऱ्यातून आयात-निर्यात मालाचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणात चालतो. न्हावा-शेवा येथील जेएनपीटी बंदरातून आंतरराष्ट्रीय व्यापार होतो. या बंदरावरील व्यापाराचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे, हे लक्षात घेता इतरही बंदरांचा विकास करणे गरजेचे असल्याचे नाहटा यांनी नमूद केले. या विभागात मुरुड-जंजिऱ्यापासून कुणकेश्वर-तारकर्लीपर्यंत अनेक ऐतिहासिक वास्तू आणि रमणीय पर्यटनस्थळे आहेत. देश-विदेशातील अनेक पर्यटक या स्थळांना भेट देतात. त्यातून आंतरराष्ट्रीय चलन प्राप्त होत असते. कोकणातील पर्यटन क्षेत्राची त्या दृष्टीने असलेली क्षमता लक्षात घेऊन या पर्यटनस्थळांचा आणखी विकास होणे आवश्यक आहे. उच्च शिक्षणाचा अभाव कोकणातील शालेय शिक्षण विभागांतर्गत एकूण सुमारे १३ हजारांपेक्षा जास्त शाळा आहेत. मुंबई आणि ठाणे येथे वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणासाठी शासकीय महाविद्यालये आहेत. पण या विभागातील उरलेल्या तीन जिल्ह्यांमध्ये उच्च शिक्षणासाठी आवश्यक महाविद्यालये आणि सुविधांचा अभाव आहे. त्याचप्रमाणे मुलींची वसतिगृहे, संगणक कक्ष, ग्रंथालयाचा विस्तार गरजेचा असल्याचे नाहटा यांनी सादरीकरणात नमूद केले. कोकणाची भौगोलिक परिस्थिती, लोकसंख्या आणि उपलब्ध नैसर्गिक साधनसामग्री लक्षात घेता राज्याच्या अन्य भागांसाठी असलेले निकष या विभागाच्या विकासाचा विचार करताना लागू करणे योग्य होणार नाही, असेही नाहटा यांनी आवर्जून प्रतिपादन केले. |