गुरुवार, १८ ऑक्टोबर २०१२ इतिहासात आज दिनांक.. १८ ऑक्टोबर १६७९महाराष्ट्रात आपल्या समुद्री सत्तेची पाळेमुळे रोवण्यासाठी आलेल्या इंग्रजांचे मराठय़ांच्या विरुद्ध दुसरे नाविक युद्ध झाले. इंग्रजांच्या रिव्हेंज या जहाजात १५ तोफा व दोनशे सैनिक बसले. ते खांदेरी बेट जिंकण्यास आले, परंतु मराठय़ांनी त्यांस पराभूत केले. १७७७ जर्मन साहित्यिक हाइन्रिख फोन क्लाइस्ट यांचा जन्म. विचारप्रकटन व भावना यांबद्दलचा गाजलेला निबंध तसेच ८ दीर्घकथा त्यांनी लिहिल्या. १९०६‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया’ अर्थात भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी या संस्थेचे कामकाज सुरू झाले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी ही संस्था सुरू केली. शिंदे यांचे चरित्रकार सुहास कुलकर्णी लिहितात, या संस्थेमार्फत शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणाचे प्रयत्न केले. समाजशास्त्रीय संशोधन करून ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला. ‘अस्पृश्यता हे हिंदू धर्माला लागलेले विकृत फळ आहे.’ अशी मांडणी करून समकालीन सुधारकांनी व चळवळींनी अस्पृश्यता निर्मूलनाचा कार्यक्रम प्राधान्याने स्वीकारावा असा आग्रह त्यांनी धरला. बौद्ध धर्म, भागवत धर्म आणि सार्वजनिक सत्यधर्म यांच्यातील पटतील तेवढय़ाच बाबींचा स्वीकार करण्याची त्यांची शिकवण होती. कृष्ण, बुद्ध, महावीर, वारकरी संत, महात्मा फुले व महात्मा गांधी हे भारतातील धर्मसुधारणेच्या परंपरेतील पाईक आहेत अशी मांडणी करून, उदार धर्मपरंपरेच्या मांडणीला महर्षीनी नवा आशय दिला. अस्पृश्यता निर्मूलन, धर्म सुधारणा व राष्ट्रीय स्वातंत्र्य यासाठी आग्रही राहून अस्पृश्य, बहुजन व शेतकरी अशा उपेक्षित वर्गाना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. प्रा. गणेश राऊत
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सफर काल-पर्वाची : कुटुंबवत्सल लेनिन रशियातील १९१७ साली झालेल्या झारशाहीविरुद्ध उठावानंतर वेगाने सर्व हालचाली करून आपला बोल्शेविक पक्ष सत्तेवर आणण्यात मुख्य भूमिका लेनिनने पार पाडली. १९२४ साली मृत्यू होईपर्यंत सर्व रशियन राजकारणावर लेनिनची घट्ट पकड होती. लेनिन व्यक्तिगत जीवनात आर्थिक पातळीवर कनिष्ठ मध्यमवर्गाप्रमाणे राहत होता. रशियाचा पंतप्रधान झाल्यावरही त्याची राहणी साधीच राहिली. त्याच्यात आत्मप्रौढी अजिबात नव्हती. कामामुळे थकवा येई तेव्हा विश्रांतीसाठी डोंगरदऱ्यात फिरून शिकार करणे त्याला आवडे. त्याचा स्वभाव खोडकर, स्वच्छंदी होता. मुलांना लेनिनकाका आपल्याकडे आले की, आनंद होई. त्याचे हास्य सातमजली होते. हसताना त्याचे शरीर घुसळून निघे. संगीताने तो प्रभावित होई. पण संगीताने भावना उचंबळून येतात व क्रांतिकारकाला ते हानिकारक असल्याने तो संगीतापासून दूर राही. लेनिन-क्रुप्सकाया यांचे वैवाहिक जीवन आनंदी होते. इनेसा या स्त्रीवरही त्याचे प्रेम होते व ती त्याच्या घरातच राही. पण पत्नी क्रुप्सकाया हिलाही नवऱ्याचे इनेसाबरोबरचे संबंध पसंत होते. लेनिन मातृभक्त होता. कुठेही असला तरी आईला नियमितपणे पत्र पाठवीत असे. त्याची आई १९१६ साली वारली. त्या वेळी लेनिन युरोपमध्ये राहत होता. १९१७ साली उठाव व नंतरच्या क्रांतीच्या गडबडीत तो रशियात आला तेव्हा प्रथम आईच्या कबरीपाशी जाऊन आईला श्रद्धांजली वाहिली. शेवटच्या क्षणी आपण आईजवळ नव्हतो, याची खंत त्याला आयुष्यभर राहिली. सर्वसामान्य माणसांचा सहवास त्याला अधिक प्रिय होता. गर्दीच्या साध्या हॉटेलमध्ये, रेल्वेच्या डब्यात त्याला अधिक मोकळे वाटे, असे क्रुप्सकायाने लिहिले आहे. ज्युलियस मार्तोव हा त्याचा जवळचा मित्र होता. ज्युलियस जरी मेन्शेविक पुढारी व लेनिनचा कट्टर विरोधक असला तरी दोघांमधली आपुलकी कधी कमी झाली नाही. सुनीत पोतनीस
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कुतूहल : मोडके फर्निचर
घरात काय किंवा कार्यालयात काय, आपण एखादी वस्तू मोडली किंवा नादुरुस्त झाली तरी ती चालवून घेतो. उदाहरणार्थ, वेताच्या खुर्चीचे वेत तुटले, खुर्चीच्या फ्रेमचे स्क्रू ढिले झाले, टेबलाच्या खालची लाकडी चौकट लापट झाली, कार्यालयातील पंख्याचा किर्र किर्र असा आवाज सुरू झाला तरी ठीक आहे म्हणून आपण ते चालवून घेतो. त्याची वेळच्या वेळी दुरुस्ती करून घेत नाही. त्यामुळे आपण खुर्चीवरून पडण्यात, टेबल मोडून पडण्यात, पंखा जमिनीवर कोसळण्यात होऊ शकते. यालाच इंग्रजीत ‘स्टिच इन टाइम सेव्हज नाइन’ असे म्हणतात. दुरुस्ती काय किरकोळ असते, पण ती लगेचच न केल्याने काहीतरी गंभीर घडू शकते. कार्यालयातील उंचावर असलेल्या कपाटातून रजिस्टर्स आणि वस्तू काढताना लेक स्टूल किंवा शिडी वापरतात. उंच स्टुलाला एका बाजूने पायऱ्या असतात. स्टुलावर चढताना माणूस पायऱ्या पाहून व्यवस्थित चढतो, पण स्टुलावरून उतरताना पायऱ्या कोणच्या बाजूला आहेत हे न पाहता तो पाय खाली सोडतो आणि स्टुलावरून खाली पडतो, पायाला दुखापत होते, प्रसंगी फ्रॅक्चर होते. एवढय़ासाठी स्टुलावरून खाली उतरताना अगोदर पायऱ्या कोणत्या बाजूला आहेत हे नीट पाहून मगच पाय खाली टाकावेत. शिडीचा वापर करताना शिडीची पायरी मोडलेली असेल तर ती प्रथम दुरुस्त करून घ्यावी आणि मगच वापरावी, कारण मोडक्या पायरीवरून चढ-उतार करताना शिडी उलटण्याची किंवा पाय सटकण्याची शक्यता असते. शिडीवर चढताना जमिनीवर एक माणूस शिडी धरून ठेवण्यासाठी नसेल तर शिडीवर चढू नये. शिडीवरून माणूस खाली पडण्याची शक्यताच अधिक असते. बांबूच्या शिडीऐवजी अॅल्युमिनियमची शिडीच शक्यतोवर वापरावी. अॅल्युमिनियमच्या शिडय़ात बरेच प्रकार उपलब्ध असतात. काही शिडय़ा इंग्रजीतील ए या आकाराच्या असतात. त्यावर माणूस चढताना ती शिडी पकडण्यासाठी जमिनीवर दुसरा माणूस लागत नाही, कारण त्या शिडीचा दुसरा पाय जमिनीवर आधार देतो. काही शिडय़ांचा वरचा भाग कपाटाजवळ वरच्या भागाला अडकवलेला असल्याने त्या शिडय़ाही जमिनीवर कोणाला धरून ठेवाव्या लागत नाहीत. अ. पां. देशपांडे मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी, मुंबई २२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मनमोराचा पिसारा.. तेरी ही बाहोंमे हम..
स्त्री-पुरुष संबंधांबद्दल लिहावं तितकं थोडं आहे, अख्खं महाभारत त्यावर रचलेलं आहे. तिथे चार-दोन ओळी लिहून नव्यानं काय सांगावं? असाही प्रश्न पडतो. जननाचे रहस्य आणि मातृत्वाची उपजत प्रवृत्ती निसर्गाने बहाल केली. पुरुषाला पाठिंबा देण्याची, त्याला प्रोत्साहन देण्याची, निराशेच्या गर्तेतून बाहेर खेचण्याची अमोघ शक्ती स्त्रीच्या ठायी असते. याचा काही लोकांना प्रत्यक्ष अनुभव घेता येतो तर कधी एखाद्या छानदार गाण्यातून स्त्री स्फूर्तिदेवता असू शकते, याचा प्रत्यय येतो. ‘तेरे खयालो में हम। तेरी ही बाहो में हम।।’ या मुखडय़ाचं आशाताईंचं गाणं मनात अचानक घुमू लागतं. तसं अपरिचित नि रामलाल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं १९६४ सालच्या ‘गीत गाया पत्थरोंने’ या व्ही. शांताराम यांच्या सिनेमातलं आहे याची आठवण करून द्यावी लागत्येय. त्यामुळे त्या गाण्याची किंचित बॅकग्राऊण्ड जितेंद्र या अशिक्षित पण गुणी कलाकाराकडे शिल्प कोरण्याची कला असते. त्याला ‘राजश्री’ भेटते. (शांतारामांची मुलगी) तिच्या परिचयातून प्रेरणा घेऊन जितूभाई शिल्प कोरू लागतात. त्याच्या आयुष्यातला हा स्फूíतदायक क्षण ‘राजश्री’ने साकारलाय. गाण्याचे बोल नीट ऐक, हवं तर गुगलून शोधून काढ आणि मग यूटय़ूबवर गाणं ऐक आणि थोडं थोडं पाहा. गाण्यातली नर्तिका स्फूर्तिदेवतेची भूमिका पार पाडते. कलाकाराच्या हातात, डोळ्यात, विचारात मी सामावलेली आहे असं ती म्हणते. पहाटेचे ताजेतवाने रंग आणि मावळतीचे गूढ म्लान रंग या निसर्गरूपात मीच असते आणि मी म्हणजे तुझी निर्मितीक्षमता, तुझी सर्जनशीलता मी ही तुझ्यातच एकरूप झालेली आहे. तेरी बाहो में म्हणजे बाहुपाशातच नाही तर तुझ्या बाहुतल्या सामर्थ्यांत, कलेत आहे. या गोष्टीची मी रम्य सुरावटीतून त्याला (पुरुषाला, कलाकाराला) जाणीव करून देते. तो क्षण या साडेतीन-चार मिनिटांच्या गाण्यातून हसरत जयपुरीने अतिशय सुंदर शब्दात मांडलाय. अशा दिव्य प्रतिभेच्या साक्षात्काराचा अनुभव तू घे. ‘पत्थरपें कर शायरी। तुझको हमारा प्रणाम ॥’ असं म्हणून गाणं संपतं. छोटंसं गाणं खूप भावतं, मनात रुजतं. ते अर्थात आशाताईंच्या सुरातल्या सौम्य आग्रही आर्जवामुळे आणि राजश्रीच्या विलक्षण देखण्या आणि समर्पक मुद्राभिनयाने व नृत्यात्मक आविर्भावामुळे. बोटांच्या सुंदर मुद्रा, प्रसन्न विधुबिंबासम चेहरा व हाताच्या लयबद्ध, सुबक आणि लवचिक हालचाली बस् पाहात राहाव्यात. वन टू का फोर करण्याची ताकद त्या रमणीय, अर्थवाही नृत्यात आहे. बाकी व्हिज्युअल साफ शाळकरी आहेत. पण राजश्री भाव खाऊन जाते. तिच्या करता गाणं पाहा. पुन्हा पुन्हा अनुभव. तुलाही स्फूर्ती मिळेल.. डॉ. राजेंद्र बर्वे
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
|