डोंबिवलीकरांनी दाखवला शेअर रिक्षांचा नवा ‘रूट’
|
|
|
|
|
आंदोलनापुढे नमून भाडय़ात १४ रुपयांपर्यंत कपात प्रतिनिधी, डोंबिवली एरवी रिक्षा-टॅक्सी संघटना एकत्र येऊन संपाच्या माध्यमातून प्रवासी भाडे वाढवण्याची खेळी करत असतात. डोंबिवलीत मात्र पहिल्यांदाच प्रवाशांनी एकजूट दाखवून आंदोलनाच्या माध्यमातून शेअर रिक्षाचे अवास्तव भाडे कमी करायला लावत सर्वसामान्यांपुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.
हकीम समितीच्या दरवाढ सूत्रानुसार डोंबिवलीतील शेअर रिक्षांच्या भाडय़ात अक्षरश: ‘छप्पर फाड के’ वाढ झाली होती. ज्या अंतरासाठी १० ऑक्टोबपर्यंत १५-१६ रुपये द्यावे लागत होते त्याच अंतराचे भाडे हकीम सूत्र लागू झाल्यानंतर, म्हणजेच ११ ऑक्टोबरनंतर तब्बल ३९ रुपये मोजणे प्रवाशांना भाग पडू लागले. ही दरवाढ सुमारे पावणेदोनशे टक्के होत होती. विशेष म्हणजे या भाडेनिश्चितीत स्थानिक आरटीओचाही सहभाग होता. रिक्षाचालकांच्या पाच संघटनांनी ही भाववाढ केली होती. मात्र, प्रवाशांनी संघटितपणे लढा उभारून हा समज सपशेल खोटा ठरवला. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी एमआयडीसीतील मिलापनगर रहिवासी संघाचे राजू नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसीतील रिक्षा वाहनतळावर दरवाढीच्या विरोधात उत्स्फूर्त आंदोलन सुरू केले. कोणीही रिक्षातून प्रवास करू नये, असे आवाहन करण्यात आले. सकाळी ऐन गर्दीच्या वेळात एमआयडीसीतील एकही प्रवासी रिक्षात बसला नाही. त्यामुळे रिक्षाचालकांनी दुपापर्यंत या वाहनतळावरून काढता पाय घेतला. प्रवाशांच्या सोयीसाठी केडीएमटीच्या बस वाढविण्यात आल्या. ‘दरवाढ कमी होत नाही तोपर्यंत कोणीही रिक्षाने जाऊ नये. आपल्या वाहनाने प्रवास करावा’, या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रवाशांच्या या दबावाचा उचित परिणाम झाला आणि पाचही रिक्षा युनियनना त्यासमोर अखेर झुकावे लागले. परिणामी ज्या अंतराचे भाडे १५ रुपयांवरून ३९ वर गेले होते ते आता २५ रुपयांपर्यंत खाली आणण्यात आले आहे.
तुमचा अनुभव काय? या घटनेतील आकडय़ांकडे फार लक्ष न देताही प्रवासी संघटित झाले तर ‘मनमानी’ दरवाढ ‘सुसह्य’ अथवा ‘वाजवी’ पातळीवर आणता येऊ शकते हा धडा अतिशय महत्त्वाचा आहे. मुंबई महानगर क्षेत्रात ज्या ज्या ठिकाणी प्रवाशांना अशा अवाजवी दरवाढीचा अनुभव येत आहे, अशांनी यासंदर्भात आपल्या प्रतिक्रिया ‘लोकसत्ता’च्या नरिमन पॉइंट, महापे व ठाणे येथील कार्यालयांकडे पाठवाव्यात.
रिक्षा-टॅक्सींचे स्टिंग ऑपरेशन मुंबई महानगर क्षेत्रात ११ ऑक्टोबरपासून लागू झालेल्या रिक्षा/टॅक्सींच्या दरवाढीचे नवनवीन ‘आयाम’ प्रवाशांना रोजच्या रोज कळू लागले आहेत. ठिकठिकाणी प्रवासी आणि ड्रायव्हर यांच्यात चकमकी झडत आहेत. तक्रारींचा पाऊस पडत आहे. परंतु प्रशासनाला आणि विशेषत: परिवहन विभागाला या सगळ्याचे जणू काहीच देणेघेणेच नाही, अशा थाटात ते निष्क्रिय बसले आहे. या साऱ्या निराशाजनक आणि संतापजनक पाश्र्वभूमीवर ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधींनी मुंबई व परिसरात ठिकठिकाणी रिक्षा आणि टॅक्सींनी प्रवास केला. एकाच अंतरावर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक मीटर लावलेल्या वाहनांनी प्रवास केला. वाहनचालकांशी आणि प्रवाशांशीही संवाद साधला. या प्रवासाचा सविस्तर वृत्तान्त उद्याच्या अंकात.. |