वन्यजीव पर्यटन व्यवसायाची चक्रे पुन्हा फिरू लागली
|
|
|
|
|
खास प्रतिनिधी नागपूर व्याघ्र प्रकल्पांमधील कोअर क्षेत्रातील पर्यटन बंदी उठविताच पर्यटन व्यवसायाची चक्रे नव्या गतीने फिरण्यास सुरुवात झाली आहे. रिसोर्ट मालकांच्या लॉबीच्या दबावाखाली राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने व्याघ्र प्रकल्पांमधील पर्यटनाची मार्गदर्शक तत्त्वे शिथिल केल्याने व्याघ्र संवर्धनाच्या दहा टक्के महसुलावर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे.
यापूर्वी व्याघ्र प्रकल्पानजीकच्या हॉटेल्स आणि रिसोर्ट्सवर १० टक्के स्थानिक कर आकारला जात होता. तो आता आकारला जाण्याची शक्यता नसल्याने महसुलात घट होणार आहे. सर्वोच्च न्यायालयालयाच्या अंतिम निकालाने पर्यटन महसुलाची नवी गणिते जुळविण्याची धडपड सुरू झाली आहे. राज्यभरातील व्याघ्र प्रकल्पांच्या आर्थिक नाडय़ा आवळल्या गेल्या होत्या. याचा सर्वात मोठा तडाखा महाराष्ट्रातील चारही व्याघ्र प्रकल्पांना बसला होता. बंदीमुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या अनेकांची रोजीरोटी धोक्यात आली होती. आता पर्यटन पुन्हा सुरू होणार असल्याने गाईड्स नव्या जोमाने कामाला भिडले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने संबंधित राज्यांना व्याघ्र संरक्षणाची योजना सहा महिन्यांत तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि राजस्थान सरकारच्या नव्या योजनेकडे लक्ष लागले आहे. वन्यजीव पर्यटनाची सर्वाधिक उलाढाल मध्य प्रदेशातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये होते, हे विशेष. चालू वर्षांच्या प्रारंभी करण्यात आलेल्या व्याघ्र गणनेच्या चौथ्या टप्प्यातील आकडेवारी आशादायी ठरण्याची दाट शक्यता असून महाराष्ट्रातील वाघांची संख्या १६९ वरून २०० पर्यंत वाढल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. त्यामुळे यंदापासून पर्यटक मोठय़ा संख्येने महाराष्ट्रात येतील, अशी अपेक्षा आहे. देशातील क्रमांक एकचा व्याघ्र प्रकल्प समजल्या जाणाऱ्या ताडोबा-अंधारीला पर्यटनाच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून चांगला महसूल मिळत आहे. २०१०-११ या वर्षांत ३५ लाख, २०११-१२ या वर्षांत ४५ लाख एवढे उत्पन्न पर्यटनापासून मिळाले आहे तर चालू २०१२-१३ या आर्थिक वर्षांत ५० लाख रुपये उत्पन्नाची अपेक्षा आहे. गेल्यावर्षी याच महसुलातून २७ लाख रुपयांचे वाटप बफर झोनमधील खेडय़ांमधील रहिवाशांना करण्यात आले. टुरिझमच्या हंगामाच्या मार्च ते जून या काळात एका गाइडला एका दिवसात ४०० रुपये मिळतात. नंतरच्या काळात पर्यटकांची फारशी चहलपहल दिसत नसली तरी किमान २०० रोज कमावण्याची संधी असते. ताडोबात किमान १०० गाइड्सची रोजीरोटी कोअर क्षेत्रामध्ये येणाऱ्या पर्यटकांवर अवलंबून आहे. गाइड्स फक्त पर्यटकांना फिरविण्याचेच काम करतात असे नव्हे तर पर्यटकांच्या अतिउत्साही हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचीही जबाबदारी गाइडवर असते. त्यामुळे अप्रत्यक्षपणे वनरक्षकाचीच भूमिका त्यांना बजावावी लागते. बफर झोन टुरिझमला चांगले यश मिळू शकते याचा धडा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने घालून दिला असून याची फळे आता मिळू लागली आहेत. जुनौना, देवडाच्या इको-डेव्हलपमेंट समित्यांनी गेल्या जून महिन्यात २० दिवसांत ३० हजार रुपयांची कमाई केली. या रकमेचा विनियोग गावक ऱ्यांना एलपीजी गॅस कनेक्शन देण्यासाठी केला जात आहे. बफर झोन पर्यटनाची सुरुवात करणारा ताडोबा-अंधारी हा पहिला व्याघ्र प्रकल्प झाल्याचा दावा वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याण कुमार यांनी केला. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात आणखी तीन गेट खुले करण्याचे संकेत वन खात्याने दिले आहेत. |