गोदावरी बंधाऱ्यांच्या कामात करोडोंचा घोटाळा!
|
|
|
|
|
फौजदारी चौकशीची भाजपची मागणी विशेष प्रतिनिधी, मुंबई माजी जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मर्जीतील कंत्राटदारांना गोदावरी नदीवरील ११ बंधाऱ्यांच्या सुमारे अडीच हजार कोटी रूपयांची कामे दिली, या बंधाऱ्यांमध्ये पाणी नाहीच, पण प्रचंड गैरव्यवहार मात्र झाला आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस देवेंद्र फडणवीस व आमदार बबनराव लोणीकर यांनी येथे केला.
भ्रष्टाचार व कंत्राटदारांच्या घशात करोडो रूपये घातल्याने २००९ मध्ये चौकशी समितीने अहवाल देऊनही कारवाई झालेली नाही. या प्रकरणासह जलसंपदा विभागातील सर्वच गैरव्यवहारांची विशेष पथकाद्वारे चौकशी करण्याचे द्यावेत, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. या बंधाऱ्यांच्या कामांची चौकशी जलसंपदा प्रधान सचिव मु. खं. कुलकर्णी यांनी केली व अहवाल दिला. तो विधिमंडळात सादरही झाला नाही. अहवाल दिला त्यावेळी प्रकल्पावर ११०० कोटी रुपये खर्च झाले होते व आतापर्यंत २४५२ कोटी रूपये खर्च झाले आहेत आणि केवळ ७ टीएमसी पाणी अडवले गेले आहे. जादा खोदाई, खर्चात अनेक पटीने वाढ, कामांची आवश्यकता नाही, बंधाऱ्यात पाणीच नाही, असे अनेक आक्षेप घेत कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका समितीने ठेवला. तरीही अहवाल दाबून करोडो रूपये खर्च होत असून आणखी ५०० कोटी रुपयांची मागणी या प्रकल्पांसाठी करण्यात आली आहे. यासंदर्भात भाजप आमदार लोणीकर यांनी फौजदारी तक्रार केली असून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापुढे जनहित याचिकाही केली आहे, असे आमदार फडणवीस म्हणाले. विदर्भ महामंडळाचे कार्यकारी संचालक गायकवाड यांच्यावर ठपका असताना ते विभागाचे सचिव झाले आणि निवृत्त होऊन जलप्राधिकरणावर गेले आहेत. विदर्भ, कोकण पाटबंधारे विकास महामंडळासह जलसंपदा विभागातील अनेक प्रकल्पांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत असताना व जनतेच्या पैशांची लूट झालेली असताना मुख्यमंत्री केवळ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशीचे आदेश देतात. प्रकल्पातील भ्रष्टाचार आणि आरोपींना या चौकशीतून शासन कसे होणार, असा सवालही त्यांनी केला. गैरव्यवहारांची उच्चस्तरीय पथकाद्वारे फौजदारी चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी न दिल्यास त्यांच्याबाबतही जनतेच्या मनात संशय निर्माण होईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. |