पुणे स्फोटातील इरफानचे नांदेडात अनेक वर्षे वास्तव्य
|
|
|
|
|
वार्ताहर, नांदेड
पुणे बॉम्बस्फोट प्रकरणात जयपूर येथे अटक करण्यात आलेला व मूळचा नगर येथील इरफान मुस्तफा लांडगे अनेक वर्षे नांदेडात वास्तव्याला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे येथे १ ऑगस्टला झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात नवी दिल्ली पोलिसांनी तिघांना अटक केली. पैकी एक म्हणजे इम्रानखान वाजिदखान नांदेडचा रहिवासी होता. इम्रानखानसह असदखान व सईद फिराज या तिघांना अटक झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू केला होता. औरंगाबाद येथील रहिवासी असलेला असदखान याचा मेहुणा इरफान लांडगे हा नगर शहरातल्या मुकुंदनगर परिसरात वास्तव्यास होता.
तिघांच्या अटकेनंतर दिल्ली पोलीस त्याच्या मागावर होते. बुधवारी त्याला जयपूर येथे ताब्यात घेण्यात आले. सुमारे सहा-सात वर्षांपूर्वी इरफान नांदेडच्या चैतन्यनगर परिसरात वास्तव्यास होता. त्याचे वडील टेलिफोन विभागात लिपीक म्हणून कार्यरत होते. नांदेडमध्ये काही काळ त्याचे शिक्षणही झाले. नांदेडच्या वास्तव्यातच तो इम्रानखानच्या संपर्कात आला. इरफान व इम्रान असदच्या माध्यमातून दहशतवादी कारवायात सक्रिय झाले. इरफान व असदचे नाते आहे. याच नात्याच्या माध्यमातून त्याने इम्रानची असदशी ओळख करून दिली. त्यानंतर ते भटकळ बंधूंच्या संपर्कात आले व सक्रिय झाले, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. पुणे बॉम्बस्फोटात या चौघांसह अन्य काही आरोपींचा सहभाग आहे. त्यांचा आता शोध सुरू आहे. इम्रान व इरफानचे शहरात आणखी काही साथीदार असावेत, असा अंदाज व्यक्त करीत एटीएसच्या स्थानिक पथकाने माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. हे चौघे इंडियन मुजाहिदीनशी संबंधित असल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे असले, तरी तपास यंत्रणांना गोंधळात टाकण्यासाठी ते वेगवेगळ्या संघटनांची नावे सांगत असावेत, असा एटीएस अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. |