पाकिस्तानी दहशत मदतनीसांची नावे अमेरिकेकडून उघड!
|
|
|
|
|
पीटीआय, वॉशिंग्टन जागतिक दहशतवादाविरोधात अमेरिकेने उघडलेल्या मोहिमेला थोडे-बहुत यश येत असले तरी जगभरात विखुरलेल्या हस्तकांमुळे दहशतवादाची पाळेमुळे उखडणे शक्य झालेले नाही. गुरुवारी अमेरिकेने दहशतवादी यंत्रणेला सर्व प्रकारचे पाठबळ देणाऱ्या तीन दहशत मदतनीसांची नावे उघड केली. तालिबान आणि उझबेकिस्तानमधील दहशतवादी यंत्रणांचे पाठीराखे म्हणून या तिघांची घोषणा करण्यात आली आहे.
या तिघांच्या यंत्रणा उलथून टाकण्यासाठी त्यांची नावे जाहीर करण्यात आली असून, त्यांच्या अमेरिका व इतर राष्ट्रांतील व्यवहारांवर बंधने लादण्यात आली आहेत. या तिघांमधील दोघे जण पाकिस्तानस्थित मौलवी असून अॅडम खान अचेक९झाई आणि आमिर अली चौधरी अशी त्यांची नावे आहेत. हे दोघे अफगाणिस्तानमधील तालिबानी दहशतवाद्यांसाठी आणि पाकिस्तानी दहशतवादी गट तेहरिक- ए- तालिबान यांच्यासाठी बॉम्ब बनवीत असल्याचे समोर आले आहे. तिसरी व्यक्ती उझबेकिस्तानमधील असून करी अय्युब बशीर असे तिचे नाव आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांना व अफगाणिस्तानमधील हल्ल्यांना लागणारा आर्थिक पुरवठा करीत असे. दहशतवादी कृत्यासाठी माणसांना गोळा करून त्यांना आर्थिक आमिषे दाखविण्यामध्येही त्याचा वाटा आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. या तिघांची अमेरिकी बँकेतील खाती, त्यांचे चालणारे आर्थिक व्यवहार गोठविण्यात आले असून, अमेरिकी नागरिक आणि कंपन्यांना त्यांच्याशी कुठलाही व्यवहार करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील नागरिकांवर तसेच संयुक्त फौजांवर हल्ले करणाऱ्या दहशतवादी यंत्रणांना मदत करीत असल्यामुळे या तिघांच्या यंत्रणा उद्ध्वस्त करण्यासाठी कंबर कसल्याचे अमेरिकी गुप्तचर यंत्रणेतील अधिकारी डेव्हिड कोहेन यांनी स्पष्ट केले. |