सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२ कोणत्याही स्पर्धा परीक्षेची एकूण प्रक्रिया ढोबळमानाने तीन भागांमध्ये विभागता येईल. पहिली अवस्था म्हणजे स्पर्धा सुरू होण्यापूर्वीची स्थिती. प्रवेश परीक्षेची तयारी करणे ही या स्पर्धा परीक्षेची दुसरी अवस्था आणि परीक्षा झाल्यावर निकाल जाहीर झाल्यावर (यश अथवा अपयश) जी स्थिती होते ती तिसरी अवस्था.
हा सर्व यश-अपयशाचा खेळ संपूर्णपणे तुमच्या अभ्यासाच्या तयारीवर व तंत्रावर अवलंबून असतो. नुकतीच आयबीपीएसमार्फत २० राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये भरतीसाठी जाहिरातदेखील प्रसिद्ध झाली आहे. आणि ठाणे जनता सहकारी बँकेत (टीजेएसबी) अधिकारी पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या परीक्षेचा अभ्यासक्रम, निवडप्रक्रिया व तयारी याविषयीची ही माहिती - टीजेएसबी बँकेत अधिकारी होण्यासाठी परीक्षा १८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.क्वांटिटेटिव्ह अॅप्टिटय़ुड, रिझनिंग, इंग्रजी व जनरल अवेअरनेस या चार विषयांवर ही परीक्षा असेल. यात प्रत्येकी ५० प्रश्न म्हणजे एकूण २०० प्रश्न २ तासांत सोडविणे आवश्यक आहे. रिझनिंग (तार्किक क्षमता चाचणी) : या घटकात शाब्दिक व अशाब्दिक अशा दोन घटकांचा समावेश होतो. अशाब्दिक घटकांत आकृत्यांची मालिका पूर्ण करणे, वेगळी आकृती शोधणे, समान संबंध असणारी आकृती पर्यायातून निवडणे (यात पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी असणारा संबंध लक्षात घेऊन त्याचप्रमाणे तिसऱ्या आकृतीचा पर्यायातील कोणत्या आकृतीशी योग्य संबंध जुळणे हे पाहणे.) त्याचप्रमाणे दोन समान संबंध असणाऱ्या आकृती दिलेल्या असताना तसाच संबंध असणाऱ्या आकृतींची जोडी निवडणे, लपलेली आकृती शोधणे, एखादा कागद विशिष्ट पद्धतीने घडी घालून पुन्हा पूर्ववत उघडल्यास तो कागद कोणत्या आकृतीप्रमाणे दिसेल. शाब्दिक तर्कक्षमता चाचणी या घटकात संख्यामालिका, मालिकेचे सूत्र ओळखणे, आकृतीतील गाळलेली संख्या पर्यायातून निवडणे, वर्णमालिका, वेगळा घटक पर्यायातून निवडणे, कंसातील संख्या शोधणे, अक्षरांची लयबद्ध रचना, सांकेतिक भाषेवर आधारित प्रश्न, दिशाविषयक प्रश्न, नातेसंबंध, वेब-आकृत्या, विधाने-अनुमान, कालमापन व घडय़ाळावरील प्रश्न, आकृत्यांची संख्या ओळखणे, बैठक व रांगेतील प्रश्न, इनपुट-आउटपुट, निर्णयक्षमता अशा घटकांचा यात समावेश केलेला असतो. तार्किक क्षमता चाचणी या घटकात अॅनॅलिटिकल रिझनिंगवरदेखील चार ते पाच प्रश्नांचा समावेश असतो. तार्किक क्षमता या घटकांची काठिण्य पातळी फार उच्च असते. अधिकाधिक प्रश्नांची उत्तरे बरोबर सोडविण्यासाठी योग्य पद्धतीने सराव हाच योग्य मार्ग आहे. संख्यात्मक अभियोग्यता चाचणी (क्वांटिटेटिव्ह अॅप्टिटिय़ुड): हा सर्व स्पर्धा परीक्षांचा अनिवार्य असा घटक मानला जातो. यात उमेदवारांचे शालान्त परीक्षेपर्यंतचे गणिताचे ज्ञान तपासले जाणारे प्रश्न विचारले जातात. यात संख्या व संख्याप्रणाली लसावि व मसावि, गुणोत्तर-प्रमाण, भागीदारी, शतमान-शेकडेवारी, काळ व काम, अंतर-वेग व वेळ, घडय़ाळावरील प्रश्न, बोट व प्रवाहावरील प्रश्न, आगगाडीवरील प्रश्न, संभाव्यता, नफा-तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, मिश्रणावरील उदाहरणे यांचा या घटकात समावेश केलेला असतो. यात डाटा इंटरप्रिटेशन (आलेखावरील प्रश्न तसेच माहितीवर आधारित प्रश्न) या घटकांचा प्रामुख्याने समावेश केलेला असतो. त्यामुळेच संख्यात्मक अभियोग्यता चाचणी घटकावरील प्रश्न सोडविण्यास उमेदवारांना सोडविताना शॉर्टकट पद्धतीचा अवलंब केल्यास जास्तीतजास्त उदाहरणे सोडविता येऊ शकतात. इंग्रजी भाषा : यात व्याकरणावर आधारित प्रश्नांचा समावेश केलेला असतो. तसेच समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अनेक शब्दांबद्दल एक शब्द, वाक्प्रचार व म्हणी, उताऱ्यावरील प्रश्न, वाक्यातील चुकीचा भाग शोधणे, वाक्य सुधारून लिहिणे, वाक्यांचा योग्य क्रम लावणे, क्रियापदाचे योग्य रूप लिहिणे, तसेच काही शब्दांना अधोरेखित करून त्या जागी पर्यायातील कोणते शब्द असू शकतात अथवा कोणत्याही नवीन शब्दांची आवश्यकता नाही, याचे योग्य उत्तर द्यायचे असते. या अभ्यासाची तयारी करण्यासाठी शब्दसंग्रह वाढवणे, तसेच इंग्रजी वाचन आवश्यक ठरते. एखादे इंग्रजी मासिक तसेच माहिती पुरविणारी वर्तमानपत्रे जरूर वाचावीत. जनरल अवेअरनेस : बँकिंग क्षेत्रातील परीक्षेत ‘जनरल अवेअरनेस’ या घटकात बँकिंग, अर्थ विमाक्षेत्राशी निगडित प्रश्न विचारले जातात. यात उफफ म्हणजे काय? रछफ म्हणजे काय? अशा प्रकारच्या संज्ञांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी अर्थविषयक मासिके वाचल्यास निश्चितपणे त्याचा चांगला उपयोग होईल. ही परीक्षा अगदी महिन्याभरातच असल्याने लवकरात लवकर अभ्यासाला लागा. परीक्षेचे स्वरूप लक्षात घेऊन योग्य तंत्राने अभ्यास केल्यास यश तुमचेच आहे. ’ बँकेचे नाव : ठाणे जनता सहकारी बँक अर्जाची अंतिम मुदत : २७-१०-२०१२ परीक्षा शुल्क : रु. ४००/- शैक्षणिक पात्रता : पदवी उत्तीर्ण (६०%) वयोमर्यादा : २० ते २३ वर्षे. |