राष्ट्रवादीचा कारभारी मीच!
|
|
|
|
|
शरद पवारांनी ठणकावले पुढील लोकसभेची निवडणूक लढवणार नाही.. मात्र पक्षाचा अध्यक्ष मीच राहणार. विशेष प्रतिनिधी, पुणे
‘‘कार्यकर्त्यांनी आग्रह केला तरी मी लोकसभेची पुढची निवडणूक लढवणार नाही, पण अध्यक्ष राहणार. मीच पक्षाचे नेतृत्व करणार आणि पूर्णवेळ करणार..’’ शरद पवार यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना असे ठामपणे सांगितले. हे वक्तव्य करत त्यांनी आपली पुढची राजकीय खेळी काय असणार याबाबत गुगली तर टाकलीच, त्याचबरोबर आपणच पक्षाचा कारभारी आहोत आणि यापुढेही राहू हेही स्पष्ट केले.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलहाने तोंड वर काढल्याचे बोलले जात होते. शरद पवार व अजितदादा यांच्यात पक्षनेतृत्वासाठी छुपा संघर्ष असून, २०१४ च्या निवडणुकीपूर्वी अजितदादांना पक्षाची सूत्रे हातात हवी असल्याच्याही वावडय़ा उठल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर पवार यांनी आपणच नेतृत्व करत आहोत आणि करणार आहोत, हे स्पष्ट केले. पक्षाच्या दोन दिवसांच्या मेळाव्याच्या वेळी त्यांनी पुण्यात पत्रकारांशी गप्पा मारल्या. त्यात त्यांनी अनेक मुद्दय़ांवर भाष्य केले. ते म्हणाले की,‘माझ्या निर्णयावर कार्यकर्ते नाराज होतील, पण आता मी लोकसभेची पुढची निवडणूक लढवणार नाही,’ गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीही पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे वक्तव्य केले होते. मात्र, त्यांनी परंपरागत बारामती मतदारसंघ कन्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी सोडला व स्वत: सोलापूर जिल्ह्य़ातील माढा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. निवडणूक लढवणार नाही, हे सांगतानाच पवार ठामपणे म्हणाले, ‘पण अध्यक्ष राहणार. पक्षाचे नेतृत्व मीच करणार आणि पूर्णवेळ करणार.’
‘२०१४ची वाट पाहावी लागणार नाही’ देशातील राजकीय परिस्थिती पाहता निवडणुकांसाठी २०१४ सालाची वाट पाहावी लागणार नाही, राजकीय अस्थिरता असते तेव्हा निवडणुकांना सज्ज राहावेच लागते, असे पवार म्हणाले. त्याच वेळी दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना, मध्यावधी निवडणुकांबाबत ‘सध्या असा अपघात होईल असे वाटत नाही,’ असेही वक्तव्यही त्यांनी केले. |