रतन टाटा यांची चीनच्या वृत्तपत्राकडून मुक्त प्रशंसा
|
|
|
|
|
वृत्तसंस्था बीजिंग भारताचे आघाडीचे उद्योगपती रतन टाटा यांनी भारत व चीन या आशियातील दोन बलशाली देशातील संबंध सुधारण्यात सकारात्मक भूमिका पार पाडली आहे, अशा शब्दांत चीनने त्यांचे कौतुक केले आहे.
१९६२ च्या भारत-चीन युद्धाला आज ५० वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने ‘शांघाय डेली’ यांनी केलेल्या भारत-चीन संबंधातील बदलांच्या विश्लेषणात असे म्हटले आहे की, रतन टाटा यांनी दोन देशातील व्यापारी संबंध सुधारण्यात मोठी भूमिका पार पाडली आहे. भारत व चीन या देशातील कंपन्यांनी परस्पर व्यापारी संबंध वृद्धिंगत करणे आवश्यक आहे, असे टाटा यांनी म्हटले होते; त्याचा दाखला या वृत्तपत्राने दिला आहे. अलीकडेच रतन टाटा यांनी असे म्हटले होते की, भारताने चीनच्या वाढत्या आर्थिक सामर्थ्यांची काळजी करण्याचे कारण नाही, उलट त्या देशाबरोबर व्यापारी संबंध वाढवले पाहिजेत. हे संबंध वाढवणे भारताला सहज शक्य आहे. या दोन देशातील संबंध हे दोन मित्रांचे संबंध असतात तसे असले पाहिजेत. टाटा यांचे हे वक्तव्य सकारात्मक व दखल घेण्यासारखे होते, असे या वृत्तपत्राने म्हटले आहे.
८० टक्के अनभिज्ञ भारताशी १९६२ मध्ये झालेल्या युद्धाबाबत चीनमधील ८० टक्के लोक अनभिज्ञ असून भारताशी दृढ मैत्री व्हावी, असे बहुसंख्य नागरिकांना वाटते, असे एका पाहणीत स्पष्ट झाले आहे. केवळ १५ टक्के लोकांना या युद्धाची माहिती आहे. ‘ग्लोबल टाइम्स’ या वृत्तपत्राने ही पाहणी केली आहे. |