भारत-चीन युद्धाची पुनरावृत्ती नाही- अँटनी
|
|
|
|
|
पन्नास वर्षांत प्रथमच हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली पीटीआय, नवी दिल्ली, रविवार, २१ ऑक्टोबर २०१२
भारत-चीन यांच्यातील १९६२ च्या युद्धाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता संरक्षणमंत्री ए.के. अँटनी यांनी फेटाळली आहे. कुठल्याही धोक्यापासून देशाचे रक्षण करण्यासाठी लष्करी दले सक्षम आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. संरक्षणमंत्री ए.के. अँटनी यांनी भारत-चीन युद्धाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. गेल्या पन्नास वर्षांत चीन युद्धातील हुतात्म्यांना प्रथमच श्रद्धांजली वाहण्यात आली.
ते म्हणाले की, आजचा भारत हा १९६२ चा भारत नाही. गेल्या अनेक वर्षांतील सरकारे पूर्वानुभवातून धडा शिकली आहेत व आपली क्षमता वाढवली आहे. लष्करी दलांचे आधुनिकीकरण केले आहे. कुठल्याही धोक्याला तोंड देण्यास आमची सैन्य दले सक्षम आहेत. अमर जवान ज्योती येथे झालेल्या कार्यक्रमास अँटनी यांच्या समवेत राज्यमंत्री एम.एम. पल्लम राजू व तीनही सेना दलांचे प्रमुख उपस्थित होते. अँटनी यांनी सांगितले की, आमच्या क्षमता आम्ही यापुढेही वाढवत राहू. १९६२ च्या युद्धातून देशाने काय धडा घेतला, असे विचारले असता ते म्हणाले की, देशांच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी लष्करी दले मजबूत करणे आवश्यक आहे. ते आम्ही करीत आहोत. लष्करी दले, गुप्तचर संस्था व देशाच्या सुरक्षेशी संबंधित सर्वामध्ये समन्वय असणे गरजेचे आहे व तेही केले जात आहे. |