कॉंग्रेस म्हणते द्या ‘बेस्ट’ बिनव्याजी कर्ज!
|
|
|
|
|
प्रतिनिधी मुंबई बृहन्मुंबई महापालिका ही ‘बेस्ट’ उपक्रमाची पितृसंस्था असल्याने महापालिकेकडून ‘बेस्ट’ला बिनव्याजी कर्ज मिळावे, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
‘बेस्ट’ समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत महापालिकेकडून १२ टक्के व्याज दराने १ हजार ६०० कोटी रुपये कर्ज घेण्याविषयीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र या प्रस्तावाला कॉंग्रेसने प्रखर विरोध केल्याने तो राखून ठेवण्यात आला. त्या पाश्र्वभूमीवर निकम यांनी महापालिका आयुक्तांना हे निवेदन सादर केले आहे. पाच वर्षांत कर्जाची रक्कम परत करण्याच्या अटीवरच हे कर्ज दिले जाणार असून मुदतीत ते परत केले नाही तर चक्रवाढ दराने व्याज आकारण्यात येणार आहे. त्यामुळे १२ टक्के व्याजदराने कर्ज घेण्यास विरोध करून निकम यांनी, हे कर्ज बिनव्याजी मिळावे, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान शुक्रवारी झालेल्या ‘बेस्ट’ समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव राखून ठेवण्यात आल्याने त्यावर सोमवार, २२ ऑक्टोबर रोजी पुन्हा चर्चा होणार आहे. |