नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाची समीर भुजबळ यांची मागणी
|
|
|
|
|
प्रतिनिधी नाशिक नाशिकरोड रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक चारची बांधणी लवकरात लवकर करावी, स्थानकावर स्वयंचलित जिना लवकर लावावा, स्थानकावरील प्रतीक्षागृहाची बिकट अवस्था दूर करावी, प्रवाशांना दहा रुपयांत पुरीभाजी मिळावी, चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी पुरेशी जागा असावी, स्थानकात चहा कमी प्रमाणात व प्लास्टिक कपमधून देणे बंद करावे, यांसह इतर अनेक मागण्या खा. समीर भुजबळ यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांच्याकडे केल्या आहेत.
आगामी कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता नाशिकरोड स्थानकाचे आधुनिकीकरण आवश्यक आहे. राज्यराणी एक्स्प्रेस दादपर्यंत नेणे आवश्यक आहे. कुसुमाग्रज एक्स्प्रेस ही गाडी सुरू करून तपोवन एक्स्प्रेसला दोन जनरल आरक्षित, दोन जनरल, एक वातानुकूलित डबा वाढविण्याची मागणीही खा. भुजबळ यांनी केली आहे. आठ गाडय़ांना नाशिकरोड स्थानकावर थांबा मिळणे गरजेचे आहे, या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. नाशिकरोड स्थानकावर रेल्वे प्रवाशांच्या अनेक वस्तू चोरीला जात असून भुरटय़ा चोरांचा सुळसुळाट झाला आहे. अनेक गाडय़ा फलाट क्रमांक दोन आणि तीनवर येतात. त्यांना उशीर झाल्यास या फलाटावर प्रतीक्षागृह नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. दुरांतो एक्स्प्रेसची वेळ एक तास आधी करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. |