शरद पवारांचा निवडणूक अजेंडा जाहीर
|
|
|
|
|
प्रतिनिधी पुणे मुस्लीम व दलित समाजाबरोबरच ग्रामीण जनता ते शहरी भागातील प्रश्न मांडतानाच राज्यातील बहुभाषिकांच्या प्रश्नांत लक्ष घालण्याचे आवाहन करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पक्षाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात आगामी निवडणुकांचा अजेंडाच जाहीर केला.
विविध पातळ्यांवर पक्षाचे काम वाढविण्याच्या सूचना करतानाच ‘‘हा देश बहुभाषिक व बहुधर्मीयांचा आहे. एकता ठेवण्यासाठी सर्वाना बरोबर घ्यावे लागेल,’’ असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप रविवारी पवार यांच्या भाषणाने झाला. पवार यांनी पक्षाची पुढील ध्येय-धोरणे जाहीर केली. पक्षाचे नेते तारिक अन्वर, प्रफुल्ल पटेल, मधुकर पिचड, अजित पवार, आर. आर. पाटील, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील या वेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, मुंबईत २७ टक्के मराठी माणसे राहतात. उर्वरित लोक इतर भाषिक आहेत. हे सर्व भारतीय असून प्रगतीत त्यांचाही वाटा आहे. राज्याचे स्वरूप बहुभाषिक असल्याचे मान्य करून या मंडळींच्याही प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे. २८८ मधील ८४ मतदारसंघांत कोण निवडून आणायचे हे हिंदी भाषिक ठरवितात. मराठीचा बरोबरच राष्ट्रभाषेचा सन्मानही झाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. मुस्लीम समाजाला सन्मानाने जगता येईल असे वातावरण निर्माण केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. आंबेडकर स्मारकासाठी केवळ दलित आमदारांना शासनाकडे जावे लागल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. |